नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र आणि कर्नाटका दरम्यान सीमाप्रश्न चांगलाच पेटला आहे. आता हा प्रश्न दिल्ली दरबारी गेला आहे. महाराष्ट्रातील राज्यसभेतील काही खासदारांनी याच मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर लागलीच आता महाविकास आघाडीचे नेते दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाचे खासदार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. याबाबतची माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली होती. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादात केंद्र सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

या भेटीत कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांची तक्रारही केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. बोम्मई यांनी जत तालुक्यातील तलावात पाणी सोडून महाराष्ट्राला डिवचले आहे. महाराष्ट्रातील काही गावांवर दावाही सांगितला आहे. दोन राज्यातील सीमा प्रश्नांचा वाद सर्वोच्च न्यायालयात असतानाही बोम्मई यांच्याकडून कुरापती केल्या जात असल्याने त्यांची तक्रार शाह यांच्याकडे केली जाण्याची शक्यता आहे. सकाळीच महाराष्ट्रातील राज्यसभेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन  सीमा प्रश्नावर चर्चा केली आहे.