मुंबई (प्रतिनिधी) : कणकवलीमध्ये श्रीधर नाईकांची भरचौकात हत्या झाली होती. तशी माझी हत्या करणार आहात का?, जे करायचे आहे ते करा, असे जाहीर आव्हान शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाजपला दिले आहे. कल्याणमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

भाजप आणि शिंदे गटाकडून महाप्रबोधन यात्रेवर सातत्याने केल्या जाणाऱ्या टीकासंदर्भात शिवसेन उपनेत्या सुषमा अंधारे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना अंधारे यांनी भाजपला एकप्रकारे आव्हान दिले आहे. 

महाप्रबोधन यात्रेनिमित्त कल्याण पूर्वमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेपूर्वी अंधारे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपला लक्ष्य केले. गुजरातच्या जनतेला महाराष्ट्राने एवढे सगळे उद्योग गिफ्ट दिलेले आहेत. महाराष्ट्राचे उद्योग गुजरातच्या जनतेला खूश करण्यासाठी उपयोगी पडले असतील तर चांगली गोष्ट आहे, असे म्हणत भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही जोरदार निशाणा साधला. भय, भ्रम, चरित्र, हत्या ही सगळी अस्त्रे तुम्ही वापरली आहेत, असे म्हणत अंधारे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.