नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले यांच्याबद्दल वारंवार आक्षेपार्ह विधान करुन चर्चेत असणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार आक्रमक झाले असून, त्यांनी संसद आवारात राज्यपालांचा निषेध केला.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारांनी आक्रमक भूमिका घेतली. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संसद भवनाच्या परिसरातील पुतळ्यासमोर कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. बीदर, भालकी, बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या घोषणाही दिल्या. यावेळी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत, राजन विचारे, विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे, डॉ. अमोल कोल्हे उपस्थित होते.