जामनगर (वृत्तसंस्था) : गुजरातमधील यंदाच्या निवडणुकीत चर्चा होती ती भाजपच्या रिवाबा जडेजाची. रिवाबा ही भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जडेजाची पत्नी. त्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले होते. काही झाले तरी पत्नीला विजयी करायचेच असा इरादा जडेजाचा होता. त्याने तो तिला विजयी करुन सार्थ केला आहे. सध्या सोशल मीडियावर रिवाबाची चर्चा आहे. या दोन्ही सेलिब्रेटींवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

रिवाबाच्या विरोधात आम आदमी पार्टीचे करसान कार्मुर हे उभे होते. रिवाबाने जवळपास चाळीस हजार मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. रिवाबा विजयी झाल्यानंतर मतदारांनी तिचे कौतुक केले आहे. विजयानंतर मोठी रॅली काढण्यात आली. यात तिचा पती रवींद्र जडेजाही सहभागी झाला होता.

रिवाबा तुझ्या या यशात तुझ्या पतीचा मोठा हात आहे. त्याच्याशिवाय तुझा विजय शक्य नव्हता, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून रवींद्र हा रिवाबाच्या प्रचार रॅलीमध्ये सक्रियपणे दिसून आला होता. तेव्हापासूनच रिवाबासाठी ही निवडणूक सोपी झाली होती.