ढाका (वृत्तसंस्था) : ढाकाच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियमवर झालेल्या भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माने नाबाद ५१ धावांची खेळी केली. ज्यात तीन चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. या कामगिरीसह रोहित शर्माने आंतराष्ट्रीय क्रिकेटमधील ५०० षटकारांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा रोहित शर्मा पहिला भारतीय आणि जगभरातील दुसरा खेळाडू ठरला आहे.

वेस्ट इंडीजचा तडाखेबाज फलंदाज ख्रिस गेलच्या नावावर ५०० हून अधिक षटकारांची नोंद आहे. आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजाच्या यादीत ख्रिस गेल अव्वलस्थानी आहे. त्याच्या नावावर ५५३ षटकारांची नोंद आहे. ५०२ षटकारांसह रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करत बांगलादेशच्या संघाने भारतासमोर २७२ धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारतीय संघाला निर्धारित ५० षटकात २६६ धावापर्यंत मजल मारता आली. हा सामना भारताने पाच धावांनी गमावला.