Breaking News

 

 

नवरदेव वाहतूक कोंडीत अडकला अन्…

कोल्हापूर (प्रतिनिधी) : उचगावकडून गडमुडशिंगीकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी झाली नाही असा एकही दिवस जात नाही किंवा मावळत नाही. राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाखालून गडमुडशिंगीकडे जावे लागते. या ठिकाणी अक्षरश: चारही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते. मोठे वाहन आले की कोंडी ठरलेली असते. आज (बुधवार) या कोंडीचा फटका एका नवरदेवाला बसला. वाहतूक कोंडीत त्याला घेऊन जाणारे वाहन अडकले. लग्नाचा पहिला मुहूर्त टळल्याने नवा मुहूर्त काढून लग्नबंधनात अडकण्याची वेळ त्याच्यावर आली.

कोल्हापूर शहरात प्रवेश करण्यासाठी मुख्य प्रवेशद्वार किंवा रस्ताच नाही. अक्षरश: बोळातील रस्त्याप्रमाणे चिंचोळ्या रस्त्यावरून शहरात प्रवेश करावा लागतो. त्यामुळे वाहतुकीची कोंडी ठरलेली असते. याचाच फटका नवरदेवासह वऱ्हाडी मंडळींना बसला. गडमुडशिंगी रस्त्यावर यशवंत मंगल कार्यालयात आज सकाळी लग्न समारंभ होता. सकाळी पावणे बाराचा मुहूर्त होता. नवरदेव वाहनातून कार्यालयाकडे जाण्यास निघाला. मुहूर्तावर पोहोचेन, असे त्याला वाटले, पण उचगांवच्या उड्डाणपुलाजवळ झालेल्या वाहतुकीच्या कोंडीमध्ये तो अडकला. सुमारे एक तासानंतर वाहतुकीची कोंडी फुटली आणि नवरदेव कार्यालयाकडे मार्गस्थ झाला, मात्र तोपर्यंत लग्नाचा मुहूर्त टळला होता. मग पुन्हा नव्याने मुहूर्त काढून वधू-वरांवर अक्षता टाकण्यात आल्या.

उचगाव उड्डाणपुलाजवळ वारंवार वाहतुकीची कोंडी होत असली, तरी तेथे वाहतूक पोलीस कधीच असत नाही. वाहतुकीच्या कोंडीमुळे नवरदेव आणि लग्नासाठी आलेल्या वऱ्हाडी मंडळींना बराच वेळ ताटकळत बसावे लागले. सगळेच कार्यक्रम पुढे ढकलावे लागले. या कोंडीला वैतागलेल्या वऱ्हाडी मंडळींनी ही वाहतुकीची कोंडी कायमस्वरूपी  संपविण्यासाठी कोणी प्रयत्न करेल का, असा संतप्त सवाल केला.  

2,079 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश