कोल्हापूर (प्रतिनिधी) : कर्नाटकातील गुंडांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करणं निंदनीय गोष्ट आहे. अशा गुंडगिरीचा निषेध करत असून, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न सामंजस्यानं सुटणं आवश्यक आहे. मात्र, कन्नडिगांकडून मराठी भाषीकांवर वारंवार होणारा अन्याय आता सहन केला जाणार नाही. तर कर्नाटकातून येणार्‍या वाहनांचा रस्ता हा कोल्हापुरातून जातो हे त्यांनी लक्षात ठेवावं, असा इशारा खासदार धनंजय महाडिक यांनी दिला. ते दिल्ली येथे हिवाळी अधिवेशनावेळी प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

खा. धनंजय महाडिक म्हणाले की, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍न प्रदिर्घकाळ रेंगाळत पडलाय. हा प्रश्‍न आता सर्वोच्च न्यायालयात आहे. न्यायालयाकडून जो काही निकाल येईल तो येईल, मात्र दोन्ही राज्यांच्या नेत्यांनी आणि केंद्रीय नेतृत्वानं, सामंजस्यानं हा प्रश्‍न सोडवण्याची आता वेळ आली आहे. तर कन्नडिगांकडून मराठी भाषीकांवर होणार अन्याय यापुढं सहन केला जाणार नाही. महाराष्ट्राच्या वाहनांवर बेळगावजवळ दगडफेक होणं चुकीचं असून, या घटनेचा निषेध करत असल्याचं खा. महाडिक यांनी सांगितलं. जर कन्नडिगांनी महाराष्ट्रातील वाहनांचं नुकसान केलं, तर कर्नाटकच्या अनेक वाहनांना कोल्हापुरातूनच पुढं जावं लागतं, हे पण त्यांनी लक्षात ठेवावं, असा गर्भीत इशारा खासदार महाडिक यांनी दिला.

तसेच महाराष्ट्र-कर्नाटक ही दोन्ही राज्य एकाच देशातील असून, एकमेकांच्या शेजारची राज्य आहेत. त्यामुळं दोन्ही राज्यांच्या नेत्यांनी सामंजस्यानं हा प्रश्‍न आता सोडवला पाहीजे. मात्र, सीमा भागातील मराठी भाषीकांवर यापुढं अन्याय खपवून घेणार नाही. वेळप्रसंगी जशास तसं उत्तर दिलं जाईल, असं खासदार महाडिक यांनी म्हंटलं आहे.