Breaking News

 

 

विवाह नोंदणी कार्यालयातील कर्मचाऱ्याला अज्ञाताची बेदम मारहाण…

कोल्हापूर (प्रतिनिधी) :  महापालिकेच्या विवाह नोंदणी कार्यालयातील अरुण प्रभावळे या ऑपरेटरला आज (मंगळवार) सकाळी साडेअकराच्या सुमारास अज्ञाताकडून बेदम मारहाण झाली. प्रेम विवाहाची नोंदणी केल्याच्या कारणावरुन ही मारहाण झाल्याचे सांगण्यात आले. अज्ञात व्यक्तीचे नाव माहित नसल्याने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात कच्ची नोंद करण्यात आली आहे.

छ. शिवाजी मार्केटच्या इमारतीमध्ये विवाह नोंदणी कार्यालय आहे. या कार्यालयात आज सकाळी साडेअकराच्या सुमारास एक अज्ञात व्यक्ती आली. आणि अरुण प्रभावळे कोण अशी विचारणा केली. त्या वेळी ऑपरेटर प्रभावळे हे खाली मान घालून काम करीत होते. हेच प्रभावळे असल्याचे माहित झाल्यावर या अज्ञाताने मारहाण सुरु केली. यावेळी झालेल्या झटापटीत टेबलवरील काच फुटली, शिवाय मारहाणीमुळे प्रभावळे यांच्या नाका- तोंडातून रक्त येऊ लागले. त्यांना आपल्याला कोण आणि का मारहाण करतंय हे समजले नाही. तिथे असलेल्या अन्य लोकांनी मारहाण करणाऱ्या व्यक्तीला बाजूला घेऊन बाहेर काढले. तोपर्यंत प्रभावळे रक्तबंबाळ झाले होते.

या कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी या मारहाणी प्रकरणी आयुक्त कार्यालयात जाऊन मारहाणीची माहिती दिली. आयुक्तांनी त्यांना पोलिसात तक्रार करा, असा सल्ला दिला. त्याप्रमाणे प्रभावळे हे लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गेले. मारहाण करणाऱ्याचे नाव माहिती नसल्याने पोलिसांनी फिर्याद न घेता केवळ कच्ची नोंद घेतली आहे.

काही दिवसांपूर्वी एका जोडप्याने आंतरजातीय विवाह केला. या विवाहाची नोंदणी या कार्यालयात करण्यात आली आहे. हा आतंरजातीय प्रेमविवाह मान्य नसल्याने या विवाहाची नोंदणी झाल्याने मुलीकडील लोकांनी प्रभावळे यांना बेदम मारहाण केल्याचा संशय आहे. प्रभावळे यांनी महापालिका कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाणीची माहिती दिली असून त्यांनी मारहाण करणाऱ्याविरूद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. लक्ष्मीपुरी पोलीस
अधिक तपास करीत आहेत.

570 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग

देश-विदेश