कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील कळंबा ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुमन विश्वास गुरव यांची बिनविरोध निवड झाली आहे. सुमन गुरव यांच्या निवडीने आ. सतेज पाटील यांचा गट कळंबा ग्रामपंचायत आपल्याकडे राखण्यात यशस्वी ठरला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसने सुद्धा खाते खोलले आहे. यापूर्वी शिरोळ तालुक्यातील राजापूरवाडी गावात भाजपचा सरपंच बिनविरोध झाला आहे.

कळंब्यात थेट सरपंचपदासाठी मागासवर्गीय महिला आरक्षण होते. या गटातून सतेज पाटील गटाकडून माजी सरपंच वनिता भोगम, अश्विनी जाधव, सुमन गुरव, वैशाली दिलीप टिपुगडे या इच्छुक होत्या. टिपुगडे व जाधव यांनी सतेज पाटील यांच्या सुचनेनुसार तत्काळ माघार घेतली. दुसरीकडे विनीता भोगम, सुमन गुरव निवडणूक लढण्याच्या भूमिकेवर ठाम होत्या. सतेज पाटील यांनी चर्चा केल्यानंतर विनीता भोगम यांनी अर्ज माघार घेतल्याने सुमन गुरव यांची बिनविरोध निवड झाली. कळंब्यात महाडिक गटाला उमेदवार मिळाला नाही. पाटील गटाकडून मात्र चार अर्ज दाखल झाले होते.