कर्जबाजारी अनिल अंबानींवर रेडिओ कंपनी विकण्याची वेळ !

0 1

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या अनिल अंबानी यांनी आता आपली बिग एफएम ही रेडिओ कंपनी विकण्याची तयारी सुरू केली आहे. रिलायंसने आपल्या रेडिओ व्यवसायातील कंपनी रिलायंस ब्रॉडकास्ट नेटवर्क (आरबीएन) विकण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी रिलायंस ब्रॉडकास्ट लिमिटेड आणि जागरण समूहाची मालकीहक्क असलेली कंपनी म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेडमध्ये (एमबीएल) एक करार करण्यात आला आहे. त्यानुसार, म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेड ही कंपनी बिग एफएमचे ४० चॅनल विकत घेणार आहे. १, ०५० कोटी रूपयांना व्यवहार करण्यात आला आहे.

सध्या रेडिओ सिटी या नावाखाली म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेडचे ३९ रेडिओ चॅनल सुरू आहेत. तर बिग एफएमचे ५८ रेडिओ चॅनल सुरू आहेत. या व्यवहाराअंतर्गत रेडिओ सिटी बिग एफएमच्या ४० रेडिओ स्टेशनचे अधिग्रहण करणार आहे. या व्यवहारानंतर रेडिओ सिटी देशातील सर्वात मोठे खाजगी रेडिओ स्टेशन बनणार आहे. तसेच हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर रिलायंस ब्रॉडकास्ट नेटवर्क म्युझिक ब्रॉडकास्ट लिमिटेडचा हिस्सा बनेल. दरम्यान, रेडिओ सिटी आणि बिग एफएमचे विलिनिकरण होणार नसल्याचे संकेत एमबीएलकडून देण्यात आले होते. बिग एफएम ही कंपनी पूर्वीच्याच नावाने कार्यान्वित राहणार आहे.

या व्यवहारामधून मिळणाऱ्या रकमेचा उपयोग रिलायंस समूह आपल्यावर असलेले कर्ज फेडण्यासाठी करणार आहे. रिलायंस निप्पो अॅसेट्स मॅनेजमेंटचा हिस्सा विकल्यानंतर मिळालेले ६ हजार कोटी रूपये आणि रिलायंस ब्रॉडकास्ट नेटवर्कच्या व्यवहारानंतर मिळणारे १ हजार ५० कोटी रूपयांचा वापर कर्ज फेडण्यासाठी करण्यात येणार असल्याचे रिलायंस कॅपिटलचे मुख्य वित्तीय अधिकारी अमित बाफना यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More