मुंबई (प्रतिनिधी) : ज्येष्ठ नाट्यकर्मी मोहनदास सुखटणकर यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. मराठी रंगभूमीवरील नटसम्राट अशी त्यांची ओळख होती. मुंबईतील घरात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मोहनदास सुखटणकर हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.

मोहनदास सुखटणकर यांनी गोवा हिंदू असोसिएशनच्या माध्यमातून दीर्घकाळ नाट्यसेवा केली. त्यांच्या नाट्य प्रवासात ‘दी गोवा हिंदू असोसिएशन’ला महत्त्वाचे स्थान आहे. या संस्थेत अगोदर त्यांनी कलाकार म्हणून प्रवेश केला आणि नंतर ते ‘कार्यकर्ता’ या भूमिकेत वावरले.

मोहनदास श्रीपाद सुखटणकर यांचा जन्म २१ नोव्हेंबर १९३० रोजी झाला. त्यांचे वडील श्रीपाद सुखटणकर हे गोव्यात नामांकित डॉक्टर होते. ‘सारस्वत विद्यालय’ या मराठी शाळेत दुसरीत शिकत असताना त्यांनी एका छोटया नाटकात काम केले होते. ‘खोडकर बंडू’असे त्या नाटकाचे नाव होते. या नाटकात त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती. मास्तरांनी त्याचे तोंड रंगविले आणि अखेर त्यांनी त्या नाटकात काम करायला होकार दिला. तेव्हापासून मोहनदास सुखटणकर यांच्या तोंडाला कायमचा रंग लागला.

‘रायगडाला जेव्हा जाग येते’ हे त्यांचे रंगभूमीवरील नाटक प्रचंड गाजले. या नाटकात त्यांनी स्त्रीपात्र सोडून बहुतांश भूमिका साकारल्या. मोहनदास सुखटणकर यांनी आतापर्यंत ४० ते ४५ नाटकात काम केले होते. ‘मत्स्यगंधा’, ‘लेकुरे उदंड झाली’, ‘अखेरचा सवाल’, ‘दुर्गी’, ‘स्पर्श’, ‘आभाळाचे रंग’ यासारख्या अनेक नाटकात त्यांनी काम केले. त्याबरोबरच ‘कैवारी’, ‘जावई माझा भला’, ‘चांदणे शिंपीत जा’, ‘थोरली जाऊ’, ‘वाट पाहते पुनवेची’, ‘जन्मदाता’, ‘पोरका’, ‘प्रेमांकुर’, ‘निवडुंग’ या मराठी चित्रपटांतही ते झळकले. ‘दामिनी’, ‘बंदिनी’, ‘महाश्वेता’ या मराठी मालिकेतही त्यांनी काम केले. ‘आनंदी गोपाळ’, ‘सिंहासन’, ‘नई दुनिया’ या हिंदी मालिकेतही ते झळकले. टीव्हीवरील मालिका विश्वात ते फारसे रमले नाहीत.