बेळगाव (प्रतिनिधी) : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वाद हा न्यायप्रविष्ट असल्याचे सांगितले होते. मात्र आज (मंगळवारी) कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या ६ वाहनांवर हल्ला केला. मंगळवारी दुपारच्या सुमारास कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावमधील हिरबागेवाडी टोलनाक्यावर महाराष्ट्राच्या वाहनांवर हल्ला केला. 

बेळगावात महाराष्ट्राच्या ६ वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या वाहनांच्या गाडीच्या काचांसह नंबर प्लेट आणि काही वाहनांचे पार्ट्स तोडण्यात आले आहे. शिवाय, कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांसमोर आंदोलन सुरू केले आहे.

यावेळी काही कार्यकर्त्यांनी ट्रकवर झेंडे मिरवले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. कन्नड संघटनांच्या या दगडफेकीनंतर कर्नाटक सरकारने कारवाई करावी, अशी मागणी राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. शंभूराज देसाई यांनी या दगडफेकीच्या घटनेचा निषेध केला. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दौरा पुढे ढकलला. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी याची दखल घ्यावी, असेही त्यांनी म्हटले. कर्नाटकच्या पोलीस महासंचालकांसोबत आपण चर्चा करणार असल्याचे त्यांनी म्हटले.

कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यामुळे महाराष्ट्रातून संताप व्यक्त केला जात आहे. शंभूराज देसाई यांनी, लवकरच आम्ही ही बाब पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मांडणार आहोत, असे मत व्यक्त केले आहे.

महाराष्ट्राच्या वाहनांसमोर कर्नाटकच्या बसेस उभ्या करून हे कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. महाराष्ट्राच्या वाहनांच्या नंबरप्लेट्स वर चप्पल आणि लाता मारल्या जात आहेत. दरम्यान, कन्नड रक्षण वेदिके आक्रमक झाल्याने आता महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पेटण्याची शक्यता आहे.

पुण्याहून बंगळुरुकडे जाणाऱ्या या वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गाड्यावर चढून घोषणाबाजी केली. हे गाड्यांसमोर आणि गाडीखाली झोपले महाराष्ट्रातील गाड्या पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली. त्यानंतर कन्नड रक्षण वेदिका संघटनेत्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

महाराष्ट्राचे मंत्री बेळगावात येण्याची शक्यता पाहून कन्नड रक्षण वेदिका संघटना आक्रमक झाली आहे. या संघनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावच्या चौकात रास्ता रोको केला. रस्त्यावर लोळण घेत वाहने अडवली. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि महाराष्ट्र सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येऊ देऊ नका, अशी मागणी कन्नड रक्षण वेदिका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना आणि खासदारांना बेळगावात प्रवेश दिला जाणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळलेला आहे. अशातच आता कन्नड रक्षण वेदिका संघटनेने महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला केला आहे. त्यामुळे हा वाद आणखीच पेटण्याची शक्यता आहे.