कोल्हापूर (प्रतिनिधी) : रमणमळा येथील एका उसाच्या शेतात गव्यांचा कळप शिरल्याचे स्थानिक नागरिकांनी पाहिल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पंधरा दिवसांपूर्वी सहा गव्यांचा कळप कोल्हापूरजवळ आठ दिवस मुक्कामास होता. सोमवारी सकाळी रमणमळा येथील विलासराव पोवार याच्या उसाच्या शेतात गव्यांचा कळप शिरला असल्याचे नागरिकांनी पाहिले. उस तोडणीचे काम सुरु असताना हा कळप शेतात घुसला. शेतातील मजुरांनी या गव्याच्या कळपास हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला; परंतु हे गवे मजुरांच्या अंगावर धावून गेल्याचे नागरिकांनी सांगितले. मजुरांनी बचावासाठी तेथून पळ काढला. नंतर गवे शेतात घुसल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली. शहराजवळ गव्यांचा कळप आल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.