सांगली (प्रतिनिधी) : कर्नाटकमध्ये जातो म्हणताच जत तालुक्यातील सीमावर्ती भागातल्या गावांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज ‘एमआयडीसी’ची घोषणा केली. आता या गावातले नागरिक काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातल्या गावांनी कर्नाटकात जायचा इशारा दिला आहे. पंढरपूर, नांदेड आणि नाशिकमध्यल्या काही गावांनीही अशीच मागणी केली आहे. त्यामुळे सरकारच्या डोक्याचा ताप वाढला आहे.

सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील लोकांसमोर पाण्याचा मोठा प्रश्न आहे. यातून मार्ग निघावा म्हणून त्यांनी राज्य सरकारला कर्नाटकात जायचा इशारा दिला. शिवाय नांदेड आणि नाशिक जिल्ह्यातल्या गावांनीही स्थानिक प्रश्न न सुटल्यामुळे कर्नाटकात जाऊ, अशी धमकी दिली. पंढरपूर कॉरिडॉर रद्द करा अन्यथा कर्नाटकात जाऊ, असा इशारा पंढरीच्या रहिवाशांनी दिला आहे. त्यामुळे नागरिकांचे न सुटलेले प्रश्न आता सरकारसाठी डोकेदुखी ठरत आहे.

उद्योगमंत्री उदय सामंत आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी जत तालुक्यातल्या गावांसाठी ‘एमआयडीसी’ स्थापन करणार असल्याची घोषणा केली. सामंत म्हणाले की, जत तालुक्यातल्या लोकांना पाणी मिळत नाही. त्यांची ही समस्या लवकरात लवकर सोडवू. शिवाय तालुक्यात शंभर हेक्टरच्या परिसरात ‘एमआयडीसी’ची उभारणा करू. त्यासाठी आठ दिवसांत मुंबईत बैठक घेऊ.

सीमाप्रश्नी सामंत म्हणाले की, हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. तिथे आम्ही सरकारची बाजू मांडू. मात्र, सध्या सुरू असलेल्या अनेक गोष्टी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या दृष्टीनेही योग्य नाहीत. महाराष्ट्रातली जनता संयमी आहे. दोन्ही राज्याचे मुख्यमंत्री, मंत्री चर्चा करतील. दोन्ही राज्यात वादळ निर्माण होणार नाही, याची काळजी घेऊ.