नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवरायांचा एकेरी उल्लेख केलेला ‘तो’ व्हिडीओ दोन वर्षांपूर्वीचा आहे. त्या विधानाबाबत मी संपूर्ण देशाची माफी मागितली होती, असे स्पष्टीकरण केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी दिले आहे. दानवेंचा यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे.

मी सध्या शिवरायांबद्दल असे कोणतेही विधान केलेले नाही. मी ते वक्तव्य काल किंवा आज केल्यासारखे दाखवण्यात येत आहे. दोन वर्षांपूर्वी केलेल्या वक्तव्याबाबत मी पुन्हा एकदा जनतेची माफी मागतो, असेही दानवेंनी म्हटले आहे. रावसाहेब दानवेंनी व्हिडिओ जारी करत आपली बाजू मांडली आहे.

रावसाहेब दानवेंनी म्हटले आहे की, काही माध्यमांनी मी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना एकेरी भाषेचा वापर केला, असे वृत्त दिले आहे. मात्र या दोन वर्षांमध्ये मी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. दोन वर्षांपूर्वी मी नाशिक दौऱ्यावर होतो. त्यावेळी तेथील पत्रकारांनी मला राज्यपालांच्या बोलण्यावर प्रतिक्रिया विचारली होती. त्यावेळी मी अनावधानाने शिवाजी महाराजांचा एकेरी शब्दांमध्ये उल्लेख केला. तेव्हा माझ्यावर टीकेची झोड उठली होती. मी तेव्हा समस्त देशवासीयांची माफी मागितली होती.