कोल्हापूर (प्रतिनिधी) : म्हापसा गोवा येथील पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या दहाव्या राष्ट्रीय निमंत्रित कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये चाणक्य मार्शल आर्ट्स संस्थेच्या २७ मुला-मुलींनी २९ सुवर्ण, ७ रौप्य व १५ कांस्यपदकांची घवघवीत कमाई करत ५१ पदके मिळवली आणि तिसऱ्या क्रमांकाच्या सांघिक चॅम्पियनशिप ट्रॉफीवर नाव कोरले.

या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गोवा अशा विविध राज्यांतून सुमारे १५०० हून अधिक विद्यार्थांनी सहभाग घेतला होता.

या देदीप्यमान कामगिरीबद्दल कोल्हापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी सर्व मुलांचा व शिक्षकांचा सत्कार केला. सर्व मुलांना प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष, मुख्य प्रशिक्षक व राष्ट्रीय पंच संदीप लाड, जिल्हा महिला अध्यक्षा व राष्ट्रीय पंच पूजा आरंडे व स्वाती माने यांना फेटा, कोल्हापूरचे महापौर या पुस्तकाची प्रत देऊन गौरविण्यात आले.

सचिन चव्हाण यांनी, चाणक्य मार्शल आर्ट्स बहुद्देशीय ही संस्था मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी कार्य करीत आहे. विविध खेळातील मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले. गरजू विद्यार्थ्याला मदत लागल्यास अथवा गरीब मुलगा पैशाअभावी जर खेळू शकत नसेल तर त्याला संस्थेमार्फत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही चव्हाण यांनी दिली.

राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ७ मुलांनी दोन्ही प्रकारांमध्ये सुवर्णपदकांची कमाई केली आहे. कुमिते आणि काताज प्रकारातील प्रथम विजेते : सयाजी चौगुले, राजवर्धन लाड, विश्वजित पाटील, राजनंदिनी लाड, प्रांजल मिठारी, दिप्ती खाडे, सई चौगुले, सिद्धी पाटील, समीक्षा गवळी, वैभवी देसाई, जोया खान, रोहिणी माने, (प्रथम व तृतीय).

स्पर्धेतील अन्य विजेते : स्वरा भेडसगावकर, आरोही शिंदे, आराध्या पवार, जिजा खोत, सर्वेश शेटके, शौर्य सुतार (प्रथम द्वितीय), शुभम पाटील (प्रथम, द्वितीय), अनुराज गाडगीळ (द्वितीय, प्रथम), हिमेश ढगे, आरुष धुमाळ, समर्थ चौगले (तृतीय, प्रथम), श्रीमय पवार (द्वितीय, तृतीय), हर्षवर्धन भालेकर (तृतीय, द्वितीय), शिवम गुरव, अद्वैत मुसळे (दोन्हीत तृतीय)

या यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे अध्यक्ष व मुख्य प्रशिक्षक संदीप लाड यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेच्या मुख्य महिला प्रशिक्षिका पूजा चौगले, स्वाती माने, गौरी व प्रियांका करवळ यांनी प्रशिक्षण दिले.