कळे (प्रतिनिधी) : करवीर तालुक्यातील भामटे येथे गायरान वसाहतीत असलेल्या तळ्यात म्हैशी धुताना दोन शाळकरी सख्ख्या भावांचा आज (रविवार) पाण्यात बुडून मृत्यू झाला. समर्थ महादेव पाटील (वय ९) आणि राजवीर महादेव पाटील (वय ८) अशी या बालकांची नावे आहेत. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. 

याबाबत अधिक माहिती अशी की, या मुलांची आजी शांताबाई राजाराम पाटील या दररोज कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर असणाऱ्या वाघजाई डोंगरावर म्हैशी चरायला घेऊन जातात. जनावरे परत घेऊन येताना त्या गायरान वसाहतीत असणाऱ्या तळ्यात त्या जनावरे पाणी पिण्यासाठी आणि धुण्यासाठी सोडतात. आज शाळेला सुट्टी असल्याने राजवीर आणि समर्थ हे आजीसोबत जनावरे घेऊन डोंगरात गेले होते. परत येत असताना म्हैशी तळ्यात पाणी पिण्यासाठी आणि धुण्यासाठी सोडून त्या घरी गेल्या.

दरम्यान, हे दोघेजण म्हैशीसोबत तलावात आत जाऊ लागली. मात्र, आत गेल्यानंतर पोहता येत नसल्याने ते पाण्यात बुडू लागले. यावेळी म्हैशींना नेण्यासाठी आजी परत आल्या असता त्यांना ही मुले दिसली नाहीत. त्यांना तळ्याच्या काठावर या मुलांची कपडे आणि चपला दिसल्या. मुले  घरी आले असतील म्हणून परत घराकडे आल्या. तर घरात ही मुले नसल्याचे निदर्शनास आले. त्याचवेळी सर्वांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

त्यांनी लगेचच याची कल्पना आसपासच्या नागरिकांना दिली. यावेळी नागरीकांनी या तलावात शोध घेतला असता ही मुले बुडाली असल्याचे निदर्शनास आले. यातील मुलाची हालचाल सुरू होती. त्याला उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या लहान मुलांचे वडिल आणि चुलते कुंभी कासारी कारखान्यांमध्ये ऊसतोडणी कामगार म्हणून काम करतात. त्यामुळे या कष्टकरी कुटुंबावर ओढवलेल्या या दुर्घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.