मुंबई (प्रतिनिधी) : राज्यात स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय स्थापन करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. स्वतंत्र दिव्यांग मंत्रालयात २०६३ पदे भरली जाणार आहेत. शिवाय यासाठी ११४३ कोटी रुपये राज्य सरकारने दिले आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आज जागतिक दिव्यांग दिन आहे. स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय असला पाहिजे अशी आपली सगळ्यांची भावना होती. हे राज्य सर्वसामान्यांच्या हितासाठी सुरू झाले आहे. या राज्यात लोकांच्या हिताचेच निर्णय होणार आहेत. आपले सरकार आल्यानंतर तुम्हाला दिव्यांग मागण्यांसाठी आंदोलन करावे लागले नाही.

या स्वतंत्र मंत्रालयासाठी २०६३ पदे यासाठी निर्माण होतील, तसेच सेक्रेटरी दर्जाचा अधिकारी यासाठी असेल. तुमच्या कल्याणासाठी जे जे आवश्यक आहे, ते सगळे हे मंत्रालय करेल. कुठलेही धोरण ठरवताना आता दिव्यांगांचे मत सुद्धा जाणून घेतले जाईल. हा निर्णय फक्त २४ दिवसात झालाय, दिव्यांग मंत्रालय आपण स्थापन केला आहे. बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा दिव्यांगांबद्दल तळमळ होती. केंद्र सरकार, नरेंद्र मोदी यांनी आश्वस्त केले आहे की, या मंत्रालयासाठी कुठेही पैसेही कमी पडणार नाहीत, असेही मुख्यमंत्री म्हणाले.