कागल (प्रतिनिधी) : कागल तालुक्यातील प्राथमिक व उपप्राथमिक आरोग्य केंद्रासंबंधातील विविध प्रस्तावास तत्काळ मंजुरी देण्याच्या मागणीचे निवेदन केंद्रीय आरोग्यमंत्री भारती पवार यांना शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी कोल्हापूर येथे दिले. भारती पवार दोन दिवसांच्या सांगली व कोल्हापूर दौऱ्यावर आल्या आहेत.

निवेदनात पुढे म्हटले आहे, कागल तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र सेनापती कापशीची मुख्य इमारत व कामगार वसाहत कसबा सांगाव, ता. कागल येथील आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारतीचे बांधकाम, चिमगाव व लिंगनूर (का), येथे नवीन उपप्राथमिक केंद्र याचबरोबर ग्रामीण रुग्णालय कागल व मुरगूड याचे विस्तारीकरण व कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक, चिखली व उत्तूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पोस्टमार्टम रूमची सुविधा असे सुमारे २१ कोटी ३८ लाखांचे विविध प्रस्ताव जि.प. च्या शिफारीनुसार मंजुरीसाठी पाठवले आहेत. त्यास तत्काळ मंजुरी देऊन या कामास गती द्यावी, अशी विनंती निवेदनाद्वारे केली आहे.

समरजितसिंह घाटगे यांनी यापूर्वी कागल तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक, येथील प्राथमिक आरोग्य केंद्र (एस्टिमेट रक्कम रु ७ कोटी १३ लाख) व गडहिंग्लज तालुक्यातील कडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र (एस्टिमेट रक्कम रु २ कोटी ५२ लाख) असे दोन प्रस्ताव आरोग्य मंत्रालय दिल्ली यांच्याकडे सादर केले होते. त्यास केंद्र शासनाने मंजुरी दिली. ही कामे पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.