Breaking News

 

 

नारायण राणे यांची घरवापसी ?

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा आणि राज्यसभा खासदार नारायण राणे पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत नारायण राणे यांच्याकडून अधिकृत खुलासा करण्यात आलेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, लवकरच नारायण राणे यांची काँग्रेसवापसी होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वीच नारायण राणे यांना काँग्रेसकडून ही ऑफर देण्यात आली होती. या सगळ्यात सोनिया गांधी यांच्या निकटच्या वर्तुळातील नेत्यांनी पुढाकार घेतला होता. मात्र, त्यावेळी राणे यांनी स्वतंत्रपणेच लढणे पसंत केले.

मात्र, लोकसभेच्या रत्नागिरी-सिंधुदूर्ग मतदारसंघात नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे यांचा पराभव झाला होता. तर दुसरीकडे शिवसेनेशी युती केल्यामुळे भाजपला संपूर्ण राज्यभरात मोठे यशही मिळाले आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्याशी पुन्हा जाहीर हातमिळवणी करणे, भाजपला परवडण्यासारखे नाही.

महाराष्ट्रात काँग्रेसकडे एकही प्रभावी नेता नाही. मात्र, नारायण राणेंच्या आक्रमक नेतृत्त्वामुळे ही उणीव भरून काढली जाऊ शकते. यामुळे राज्यात पक्षाला नवसंजीवनी मिळेल, या आशेने काँग्रेसकडून राणेंना निवडणुकीपूर्वीच ‘घरवापसी’चा प्रस्ताव देण्यात आला होता. मात्र, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी राणेंचा ३६ चा आकडा असल्यामुळे याबाबत अनेकांना साशंकताच होती. परंतु, आता लोकसभा निवडणुकीत स्वत: अशोक चव्हाण हेदेखील पराभूत झाले आहेत. त्यामुळे अशोक चव्हाण हेदेखील प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे.

3,102 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग