धामोड (प्रतिनिधी) : धामोड परिसरातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत दुरंगी लढती होतील, असे सध्याचे चित्र आहे. यामध्ये धामोड, कोते, चांदे, आपटाळ, खामकरवाडी ग्रामपंचायतींमध्ये दुरंगी लढतीमुळे कमालीची चुरस पाहावयास मिळणार आहे.

लोकसभा, विधानसभा तसेच जिल्हा पातळीवरील प्रत्येक निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राधानगरी तालुक्यातील तुळशी परिसरामधील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून मतदान होणार की समझोता होऊन बिनविरोध निवडी होणार हा एकच प्रश्न प्रत्येक राजकीय अभ्यासकांच्या मनात घोळत होता.

प्रामुख्याने धामोड, कोते, चांदे, आपटाळ, खामकरवाडी आणि केळोशी बुद्रुक या ग्रुप ग्रामपंचायतींसाठी निवडणूक होत आहे. त्यामध्ये केळोशी बुद्रुक ग्रामपंचायतीची निवडणूक जवळजवळ बिनविरोध होणार हे निश्चित झाले आहे. धामोड, कोते, चांदे, आपटाळ आणि खामकरवाडी या गावांमध्ये दुरंगी लढती होतील, असा रागरंग आहे. त्यामुळे गटागटामध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.

सदस्यपदी योग्य उमेदवार निवडला जावा, तसेच सरपंच आमच्याच पक्षाचा (गटाचा) निवडून यायला हवा, यासाठी रणनीती आखली जात आहे. कदाचित निवडणुकीमुळे जोरदार चुरस वा संघर्ष पाहायला मिळणार आहे. उमेदवारी अर्ज माघारी नंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे. असे असले तरी बहुतेक ठिकाणी दुरंगी लढतीसाठी पॅनेलची बांधणी सुरु झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत टोकाची ईर्षा या परिसरात पाहावयास मिळणार आहे. स्थानिक पातळीवरील नेते कोणती राजकीय भूमिका घेतात, कोण कोणाला भक्क्म पाठिंबा देतेय, यावर उमेदवाराचे यशापयश अवलंबून आहे.