कोल्हापूर (प्रतिनिधी) : येथील मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील इंदिरानगर झोपडपट्टीमध्ये लागलेल्या भीषण आगीमुळे २२ झोपड्या जळून खाक झाल्या. या नुकसानग्रस्ताच्या घरांबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी आमदार सतेज पाटील, आ. जयश्री जाधव यांच्यासोबत महापालिका अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊ. मात्र, तोपर्यंत तातडीने तात्पुरत्या शेड उभारून या लोकांच्या निवाऱ्याची व्यवस्था करू, असे आश्वासन आमदार ऋतुराज पाटील यांनी दिले.

शिवाजी पार्कमधील इंदिरानगर सोनझार गल्लीत आमदार ऋतुराज पाटील यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. सर्व कुटुंबीयांची विचारपूस करून त्यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

आमचे हातावरचे पोट आहे. जे काही व्यवसायाच सामान होते ते जळून खाक झाले. कष्टाने उभे केलेला संसार जळून खाक झाला आहे, असे सांगताना अनेकांना गहिवरून आले. १९७२ पासून ही झोपडपट्टी अस्तित्वात असल्याचे सांगून येथील रहिवाशांनी कायमस्वरूपी पक्क्या घरांची मागणी केली.

रहिवाशांच्या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव यांच्यासमवेत बैठक घेण्याचे नियोजन करण्यात येईल. येथील मार्गी लावण्यात येतील, असे आश्वासन आ. ऋतुराज पाटील यांनी दिले. सोनझारी समाजाचे अध्यक्ष मारुती सोनझारी, तानाजी मोरे, रोहित जाधव, सुरेश सोनझारी, मारुती सोनझारी, बाजीराव सोनझारी, शिवाजी सोनझारी, मनोज सोनझारी आदी उपस्थित होते.