Breaking News

 

 

‘महात्मा गांधींची विचारधारा हरली, याचेच दु:ख..!

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीत साध्वी प्रज्ञा सिंगसारख्या नवख्या उमेदवाराकडून पराभव झाल्यावर मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग निराश झाले आहेत. त्यांनी आपल्या पराभवावर भाष्य करताना पुन्हा गांधीहत्येचा राग आळवला आहे. लोकसभा निवडणुकीत महात्मा गांधींच्या हत्येची विचारधारा जिंकली आहे आणि महात्मा गांधींची विचारधारा हरली, ही सर्वात चिंतेची बाब असल्याचे ते म्हणाले.

मध्यप्रदेशासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या भोपाळ मतदारसंघातील या लढतीमध्ये भाजपच्या साध्वी प्रज्ञासिंह यांनी दिग्विजय सिंह यांचा ३ लाख ६४ हजार ८२२ मतांनी पराभव केला. प्रज्ञा सिंह ठाकूर यांना एकूण ८ लाख ६६ हजार ४८२ मते मिळाली. तर त्यांचे प्रतिस्पर्धी असलेल्या कॉंग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांना पाच लाख सोळाशे साठ  मते मिळाली. या मतदार संघात ५ हजार ४३० मतदारांनी नोटाला पसंती दिली.  पराभूत झाल्यानंतर दिग्विजय सिंह यांनी एक पत्रकार परिषद घेत पराभवावर भाष्य केले.

महात्मा गांधींच्या हत्येची विचारधारा जिंकली आहे आणि देशात महात्मा गांधींची विचारधारा हरली ही सर्वात चिंतेची बाब आहे. विकासासाठी भोपाळच्या जनतेला जी आश्वासने मी दिली ती पूर्ण करण्याचा शक्य तेवढा प्रयत्न करेन. मी हरल्यानंतरही भोपाळच्या लोकांसोबतच राहीन असेही ते म्हणाले.  भाजपाने २०१४ मध्ये २८० चा नारा दिला होता आणि तितक्या जागा त्यांना मिळाल्या. या निवडणुकीत त्यांनी ३००  पारचा नारा दिला आणि या वेळेसही तो खरा ठरला. भाजपाकडे अशी कोणती जादुची छडी आहे की ते जे म्हणतात तसंच होतं ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

864 total views, 3 views today

One thought on “‘महात्मा गांधींची विचारधारा हरली, याचेच दु:ख..!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *