कोल्हापूर(प्रतिनिधी) : सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत संविधान दिन दि. २६ नोव्हेंबर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन दि.६ डिसेंबर हा कालावधी सामाजिक समता पर्व म्हणून साजरा करण्यात येत असून, सामाजिक समता पर्वामध्ये दर दिवशी सहाय्यक आयुक्त समाजकल्याण कार्यालयामार्फत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

समता सप्ताहाचा एक भाग म्हणून आज स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी तसेच नागरिकांसाठी जादूटोणा विरोधी अधिनियम २०१३ च्या अनुषंगाने जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जिल्हा समन्वयक सीमा पाटील यांनी प्रहसन या प्रकारातून विद्यार्थ्यांचे विनोदी तसेच प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांनी जादूटोणाविरोधी तसेच अंधश्रद्धाविरोधी मानसिकता जतन करून पुढच्या पिढीमध्ये त्याचे अंकुर रुजावेत या दृष्टीने कार्य करावे, अशी अपेक्षा डॉ. कुंभार यांनी व्यक्त केली. सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी विद्यार्थ्यांना अंधश्रद्धेच्या दुनियेतील अंधारी बाजू समजावून सांगून समाजाला तसेच देशाला पुढे नेण्यासाठी घातक असलेल्या प्रवृत्तीपासून दूर राहण्याचे आवाहन केले.

प्रास्ताविक कार्यालय अधीक्षक सचिन पाटील यांनी केले. समाजकल्याण निरीक्षक दत्तात्रय पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचालन तालुका समन्वयक सचिन परब यांनी केले. स्वामी विवेकानंद महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, समाजकल्याण कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. समता पर्व अंतर्गत २ डिसेंबर रोजी दुपारी १२  वाजता सामाजिक न्याय भवन, विचारे माळ येथे जिल्हास्तरीय युवा गटांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.