मुंबई (प्रतिनिधी) : शिवराय आग्रातून बाहेर पडले तसे शिंदे बाहेर पडले, औरंगजेबाने जसे शिवरायांना थांबवले तसे शिंदेंनाही कुणीतरी रोखले असे म्हणताना शिवाजी महाराज स्वराज्यासाठी बाहेर पडले तसे एकनाथ शिंदे हे बाहेर पडले असेही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटले आहे.

मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, औरंगजेबाने शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये किल्ल्यात बंद करुन ठेवले होते. त्यावेळी शिवाजी महाराज यांनी स्वराज्यासाठी जसे तिथून बाहेर आले, तसे एकनाथ शिंदेंना बाहेर पडू न देण्यासाठी अनेक प्रयत्न झाले, पण महाराष्ट्रासाठी ते बाहेर आले असे म्हणत मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेची तुलना एकनाथ शिंदेंच्या बंडाशी केली आहे. गेली काही दिवस शिवाजी महाराजाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.

लोढा यांचे हे वक्तव्य दुर्दैवी : मिटकरी 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी लोढा यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागले आहे. मंगलप्रभात लोढा यांचे हे दुर्दैवी वक्तव्य आहे, तसे लोढा आणि शिवाजी महाराजाच्रूा इतिहासाचा काही संबंध असेल असे मला वाटत नाही, त्यांचा तितका अभ्यासही असेल असे मला वाटते. त्यांच्याकडे पर्यटन खाते असले तरी एवढी त्यांची बुद्धीमत्ता नाही अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली आहे. शिवाजी महाराजांनी गद्दारी केली नव्हती, ते स्वराज्य वाचविण्यासाठी महाराजांचे नियोजन कौशल्य होते. राज्यपालांनी ज्या पद्धतीने शिवरायाचा अपमान केला तसेच हे वक्तव्य आहे. याचा आम्ही निषेध व्यक्त करतो, असेही अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे.

लोढांच्या वक्तव्याने महाराजांचा अपमान

आदित्य ठाकरे म्हणाले, ज्यांना महाराष्ट्र गद्दार समजतो, खोकेबाज समजतो, त्यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणे हे पूर्वनियोजित आहे. महाराष्ट्राचे खच्चीकरण करण्याचा एककलमी कार्यक्रम शिंदे सरकारकडून सुरू आहे. त्यानुसारच मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी वक्तव्य केले आहे. मंत्री लोढांचे वक्तव्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. केवळ शिवरायच नव्हे तर महाराष्ट्राचाही अपमान आहे.

अजित पवार यांच्याकडून कानउघडणी

वाचाळविरांना आवरा हे सातत्याने सांगत आहे. एखाद्याला ठेच लागली तर दुसरा, ठेच लागू नये म्हणून प्रयत्न करतो; परंतु यांच्यात चुका करण्याची स्पर्धा लागली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासमोर ही तुलना करण्यात आली.; पण आपल्यावर जबाबदारी काय आहे, कोणाची तुलना करतो, कसे वागले आणि बोलले पाहिजे, याचे भान असायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाची तुलना होऊ शकते का? याचे तारतम्य या लोकांना राहिले नाही आहे,’ अशा शब्दांत अजित पवार यांनी लोढा यांची कानउघडणी केली आहे.