Breaking News

 

 

‘वंचित’मुळे महाआघाडीचा राज्यात सुपडासाफ : महायुतीचा प्रचंड विजय

कोल्हापूर (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीने काँग्रेस-राष्ट्रवादी-स्वाभिमानीचा दारूण पराभव केला आहे. दुपारी दोनपर्यंत हाती आलेल्या कलानुसार, महायुतीने ४८ जागांपैकी ४२ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस १, राष्ट्रवादी – ४, तर वंचित आघाडी १ जागांवर आघाडीवर आहे. उमेदवारांना मिळालेली मते पाहता काँग्रेस-राष्ट्रवादीप्रणीत आघाडीला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी मिळविलेल्या मतांंचा फटका बसला आहे.

प्रकाश आंबेडकर यांनी ‘एमआयएम’ला सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. काँग्रेस-राष्ट्रवादीने त्यांना सोबत घेण्याचा प्रयत्न केला, परंतु आंबेडकर यांनी अशक्यप्राय अटी ठेवून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाण्याचे टाळले. मुस्लीम-दलित मतदारांची मोट बांधून त्यांनी राज्यभर ‘हवा’ केली, परंतु त्याचे मतांत परिवर्तन करण्यात त्यांना अपयश आले. स्वत: प्रकाश आंबेडकर हे अकोला आणि सोलापूर या दोन्ही मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. केवळ औरंगाबादमध्ये त्यांच्या आघाडीचे इम्तियाज जलील सध्यातरी पुढे आहेत.

काँग्रेस-राष्ट्रवादीची भिस्त ज्या परंपरागत मतदारांवर होती, त्या दलित आणि मुस्लिम समाज घटकांतील मोठ्या वर्गाची मते वंचित बहुजन  आघाडीला मिळाली. त्यामुळे आघाडीला केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या कामाबद्द्ल जनतेत असलेला असंतोष मतांत परिवर्तन करण्यात अपयश आले. त्याचाच परिणाम म्हणून सांगली, हातकणंगले, सोलापूर, नागपूर या महत्त्वाच्या जागांवर महायुतीच्या उमेदवारांचा विजय सोपा बनला.

त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीकडून वंचित बहुजन आघाडीवर भाजपची ‘बी’ टीम असल्याचा आरोप खरा होता, हे सिद्ध झाल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग