मुंबई (प्रतिनिधी) :  इतके दिवस बासणात असलेला सीमा प्रश्न नेमका आताच कसा वर आला? इतर प्रश्नांवरुन लक्ष वळविण्यासाठी तर हा प्रश्न समोर आणण्यात आला नाही ना? असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकारांशी केला. त्यांनी सध्या राज्यातील राजकारणावरुन लक्ष हटविण्यासाठीच हा सीमावाद पेटविण्यात येत असल्याचे संकेत दिले आहेत. 

कोणत्या तरी महत्वाच्या मुद्यावरुन भरकटवण्यासाठी, लक्ष विचलीत करण्यासाठी सीमावादाचा मुद्दा आताच समोर आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. सीमावादाच प्रश्न नेमका आताच कसा समोर आला, असा प्रश्न करत, त्यांनी यामागचे कारण स्पष्ट केले. अर्थात सीमावादाचा मुद्दा समोर करुन कोणीतरी राज्यातील मूळ प्रश्नांवरचे लक्ष दुसरीकडे वळवित असल्याचा अप्रत्यक्ष आरोप ठाकरे यांनी केला. कोणीतरी त्यासाठी प्रयत्न तर करत नाही ना? असा सवाल त्यांनी केला.

सीमावादाचा प्रश्न सध्या न्याय प्रविष्ठ आहे. न्यायालय त्यावर निर्णय देईल. पण माध्यमांचा आणि जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठी कोणीतरी प्रयत्न तर करत नाही ना, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढणार असल्याचेही राज ठाकरेंनी येथे जाहीर केले. ते म्हणाले, महालक्ष्मीचे दर्शन घेऊन कोकण दौरा सुरु करत आहे. बुधवारी १० वाजता देवीचे दर्शन झाल्यानंतर सावंतवाडीला जाईन. कोकण दौरा आटोपल्यावर पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करणार आहे. सध्या महाराष्ट्राचा दौरा सुरु असून, निवडणुकीबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहोत, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

राजकीय प्रश्नांवर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, रणनीती कुणी सांगते का? कोणताही लढा हा प्रस्थापितांच्या विरोधातच असतो. बालेकिल्ले हलत नाहीत असे होत नाही. प्रत्येक पक्षाचे, संघटनेचे अंतर्गत काम सुरु असते. मी माझ्या पक्षासाठी काम करत असतो.