नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदेंची की उद्धव ठाकरे यांची? या संबंधी निवडणूक आयोगासमोर येत्या १२ डिसेंबर रोजी ही सुनावणी होईल, असे सांगण्यात आले आहे. ठाकरे आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांचे वकील निवडणूक आयोगासमोर या दिवशी युक्तिवाद करतील. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकांच्या आधी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह तात्पुरते गोठवले होते. दोन्ही गटांना वेगळी नावे देण्यात आली होती. आता येत्या १२ डिसेंबरला शिवसेनेवर कुणाचा दावा प्रबळ ठरतोय, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

शिंदे आणि ठाकरे या दोन्ही गटांना शिवसेना पक्षावर दावा सांगण्याकरिता पुरावे म्हणून सर्व कागदपत्रे सादर करण्याची मुदत निवडणूक आयोगाने दिली होती. २३ नोव्हेंबरला ही मुदत संपली. दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगाकडे महत्त्वाचे पुरावे सादरही करण्यात आले आहेत.

शिवसेनेतील आमदारांनी बंड केल्यानंतर आमदार अपात्रतेचा आणि शिवसेना पक्षाचा मुद्दा सुप्रीम कोर्टात गेला. मात्र कोर्टाने या प्रकरणी निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याच्या सूचना केल्या आहेत. अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या आधी निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष चिन्ह गोठवले. त्यानंतर दोन्ही पक्षांना नाव आणि चिन्ह देण्यात आली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, तर एकनाथ शिंदे यांच्या गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आले. ठाकरे गटाला मशाल आणि शिंदे गटाला ढाल-तलवार हे चिन्ह देण्यात आले.