‘जीएसटी’तील कपात ही गृह खरेदीसाठी पर्वणी : राजीव परीख

0 1

पुणे (प्रतिनिधी) : जीएसटीमधील सवलतीच्या दराचा फायदा सामान्य ग्राहकास होत आहे. यापूर्वी १२ टक्के जीएसटीमुळे ग्राहकांचा भोगवटा प्रमाणपत्र अथवा पूर्ण झालेल्या प्रकल्पामध्ये फ्लॅट बुकिंग करण्याचा कल होता, मात्र नवीन नोटिफिकेशनमुळे राज्यभरात सदनिकांचे मोठ्या प्रमाणात बुकिंग होईल. ‘जीएसटी’तील कपात ही गृह खरेदीसाठी पर्वणी ठरेल, असा विश्वास महाराष्ट्राचे अध्यक्ष राजीव परीख यांनी व्यक्त केला. ते पुणे येथे क्रेडाई, महाराष्ट्रतर्फे आयोजित परिसंवादात बोलत होते.

जीएसटीच्या योजनेची माहिती सर्व विकसकांना तसेच चार्टर्ड अकाउंटंट, जीएसटी कन्सलटंट यांना व्हावी यासाठी क्रेडाई महाराष्ट्रतर्फे राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. सोलापूर, जळगाव, मालेगाव, सातारा, नाशिक, नवी मुंबई, रत्नागिरी, सावंतवाडी, अमरावती, धुळे, कोल्हापूर येथे झालेल्या परिसंवादात चार्टर्ड अकाउंटंट संकेत शहा, चेतन ओसवाल, पोतदार यांनी मार्गदर्शन केले.  

केंद्र शासनाने १ एप्रिल २०१९ पासून घर बांधणीच्या प्रकल्पाकरिता पूर्वीच्या १२ टक्के  व ८ टक्के जी. एस. टी दरावरून ५ टक्के व १ टक्के इतका दर कमी करून भरघोस सवलत देऊ केली आहे. त्यानुसार शासनाने ग्राहकास ५ टक्के व परवडणारी घरे अर्थात नॉन मेट्रो शहरांसाठी ज्या सदनिकांचे चटई क्षेत्र ९० चौ. मी. पेक्षा कमी व सदनिकांची एकूण किंमत ४५ लाखांच्या आत असेल तर त्याला १ टक्के  जी. एस टी दर लागू केला आहे. या जीएस टीच्या योजनेमध्ये मात्र विकसकास इनपुट क्रेडीटची वजावट घेता येणार नाही, असे राजीव परीख यांनी यावेळी स्पष्ट केले.

तसेच क्रेडाई महाराष्ट्रतर्फे ज्या प्रकल्पाचे ३१ मार्च २०१९ पूर्वी बांधकाम सुरु आहे अशा प्रकल्पांकरिता या नवीन नोटीफिकेशन नुसार जीएसटी लावायचा की,  जुन्या पद्धतीने १२ टक्क्याप्रमाणे जी. एस. टी लावून इनपुट क्रेडीट घ्यायचे हा निर्णय घेण्यासाठी २० मे ही अंतिम मुदत जीएसटी कौन्सिलने ठरवून दिली होती. याबाबत निर्णय घेण्याकरिता हा परिसंवादाचा खूप फायदेशीर ठरला अशा भावना विकसकांनी व्यक्त केल्या.

इनपुट क्रेडीट वजावटीची संधी निघून गेल्याने बांधकामासाठी होणारा खर्च २५० ते ३०० रुपये प्रति चौ. फूट इतका वाढला आहे. त्यामुळे पर्यायाने बांधकाम व्यावसायिकांना फ्लॅट विक्रीच्या दरामध्ये थोडी वाढ करावी लागणार आहे. मात्र मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत जीएसटी कमी झाल्याने ग्राहकांसाठी गृह खरेदी सोपी झाली आहे. या पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More