गडहिंग्लज (प्रतिनिधी) : संकेश्वर-बांदा महामार्गासाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीला ५ पट मोबदला मिळाला पाहिजे, अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात आली.

संकेश्वर-बांदा महामार्ग बाबत आलेल्या निवेदनावर चर्चा करण्यासाठी प्रांताधिकारी बाबासाहेब वाघमोडे यांनी संबंधित अधिकारी व निवेदन देणाऱ्यांची बैठक नगरपालिकेच्या सभागृहात बोलावली होती. त्यावेळी मागणी करण्यात आली.

बैठकीमध्ये महामार्गाचे कार्यकारी अभियंता मुदाळे यांनी होत असलेल्या महामार्गाबद्दल माहिती दिली. हा महामार्ग २ पदरी होणार असून, १० मीटर रुंदी व दोन्ही बाजूला प्रत्येकी एक मीटर बाजूपट्टी होणार असल्याचे सांगितले. त्यांनतर  स्वाभिमानीचे राजेंद्र गड्ड्यानावर, शिवाजी गुरव, शिवाजी इंगळे यांच्यासह शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या.

महामार्गाला आमचा विरोध नाही; मात्र महामार्गाच्या शेजारी असलेल्या आमच्या जमिनी मोजून द्यावी आणि नंतर रस्त्याचे काम सुरु करावे. जर आमची जमीन हवी असेल तर जमिनीला पाचपट मोबदला मिळाला पाहिजे. त्याशिवाय जोपर्यंत आमच्या जमिनी मोजून देणार नाही. तोपर्यंत रस्त्याचे काम सुरू करू नका, असा इशाराही बैठकीत देण्यात आला.