मुंबई (प्रतिनिधी) : बेळगावात ३० मार्च २०१८ रोजी प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी बेळगाव न्यायालयाने ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांना समन्स बजावले आहे. येत्या १ डिसेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश बेळगाव न्यायालयाने दिले असून, हजर न झाल्यास त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. 

पत्राचाळ प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर काही दिवसांपूर्वीच राऊत हे तब्बल ११० दिवसांनी तुरुंगाबाहेर आले होते. यानंतरही राऊतांची केंद्रातील भाजप सरकार आणि राज्यातील शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची तोफ थांबलेली नाही. मात्र, हेच संजय़ राऊत पुन्हा चौकशीच्या फेरीमध्ये अडकण्याची शक्यता आहे.

बेळगाव न्यायालयाने समन्सवर भाष्य करताना राऊत म्हणाले, अटकेच्या कारवाईला मी घाबरत नाही. मग ती कारवाई कर्नाटक सरकारची असो वा इतर कुणाची, मला फरक पडत नाही आणि कर्नाटकला जाताना तर मी लपूनछपून नाही तर शिवसैनिकांच्या मोठ्या संख्येसह कोल्हापूरमार्गे बेळगावला जाईल. पण २०१८ साली केलेल्या भाषणात आक्षेपार्ह असे नेमके काय होते, तेच मला कळलेले नाही.

कर्नाटक सरकार मला बेळगावात बोलवून अटक करण्याची शक्यता आहे. मी न्यायालयात गेल्यावर माझ्यावर हल्ला होईल, अशी माझी माहिती आहे. बेळगाव न्यायालयात गेल्यावर मला अटक करावी आणि मला तिकडे बेळगावच्या तुरुंगात टाकावे अशा प्रकारचे कारस्थान सुरू असल्याचे माझ्या कानावर आले असल्याचा गौप्यस्फोट देखील संजय राऊतांनी केला आहे.

राऊत म्हणाले, कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी सोलापूर आणि सांगलीतील काही गावांवर दावा ठोकत ते कर्नाटकाला जोडण्याबाबत वक्तव्य केले आहे. त्यांनी या विषयाला आधी तोंड फोडले; पण महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून आम्ही लढा देत आहोत. त्यामुळे आम्हाला कायदेशीर बाबींमध्ये गुंतवणे, बेळगावात बोलवून हल्ले करणे असे कारस्थान शिजताना मला दिसत आहे. याची दखल महाराष्ट्र सरकारने घ्यायला हवी.