मुंबई (प्रतिनिधी) : एकीकडे छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी अडचणीत आल्याचे चित्र आहे, तर खुद्द भगतसिंह कोश्यारी यांनाच आता महाराष्ट्रात हे पद नकोय, अशी माहिती समोर आली आहे. कोश्यारी यांनी आपल्या निकटवर्तीयांकडे ही भावना व्यक्त केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय हालचालींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यपाल कोश्यारी सातत्याने महाराष्ट्रातील नागरिकांना दुखावणारी वक्तव्ये करत आहेत. मुंबईतून गुजरातींचा पैसा काढून घेतला तर काही उतरणार नाही, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत नुकतेच केलेले वक्तव्य… यावरून महाराष्ट्रातील नागरिकांनी तसेच विविध संघटनांनी तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. वेळोवेळी राज्यपालांना पायउतार करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

छत्रपती शिवरायांची तुलना शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्याशी केल्यानंतर महाविकास आघाडी राज्यपालांविरोधात आक्रमक झाली आहे. केंद्र सरकारमधील भाजपने यावर तत्काळ भूमिका घेऊन, महाराष्ट्रातून या राज्यपालांची हकालपट्टी करावी, अशी मागणी शिवसेनेने लावून धरली आहे.

महाविकास आघाडीचे यावर एकमत असून, लवकरच या मागणीसाठी आक्रमक आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र बंद’ केला जाईल, असे संकेत उद्धव ठाकरेंकडून देण्यात आले होते; मात्र या संपूर्ण घटनाक्रमाला आता कलाटणी मिळाल्याचे दिसत आहे. राज्यपालांनाच महाराष्ट्रात या पदावर राहण्याची इच्छा नसल्याचे पुढे आले आहे.