साळवण (प्रतिनिधी) : सुमारे ४२ वर्षांपासून रहिवासी असणाऱ्या गगनबावडा तालुक्यातील निवडे ग्रा.पं. हद्दीतील गायरान जमिनीतील घरे काढण्यासाठी शासनाने कारवाई सुरु केली आहे. याच्या निषेधार्थ  स्थानिक लोकप्रतिनिधी आणि ग्रा.पं.च्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या  मिळकतधारकांनी येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. याबाबतचे निवेदन गगनबावड्याचे तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांना मोर्चाद्वारे जाऊन आज (शुक्रवार) देण्यात आले.

निवडे ग्रामपंचायत हद्दीत १९८० पासून बेघर वसाहत स्थापन झाली आहे. येथील नागरिकांना शासनाच्या आदेशाने घर बांधकामासाठी प्लॉट मंजूर करण्यात आले असून त्यांनी घरे बांधली आहेत. ग्रामपंचायतीने त्यांचा घरफाळा, वीज, पाणी आणि इतर नागरी सुविधा पुरविल्या आहेत. परंतु, अतिक्रमण असल्याबाबत आजअखेर कधीही नोटीस दिली नाही. शासनाच्या परिपत्रकानुसार सन २०११ पूर्वीची अतिक्रमणे नियामित करण्याची कार्यवाही ग्रामपंचायतीने केलेली नाही. परंतु, ग्रामपंचायतीच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे येथील मिळकतधारकांना घरे काढण्याच्या नोटीसा लागू केल्या आहेत.

त्यामुळे ग्रामस्थांना बेघर होण्याची वेळ येणार आहे. तर संतप्त झालेल्या  मिळकतधारकांनी येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला. तर या निर्णयाची प्रत पंचायत समितीला सह्यांसहीत ग्रामस्थांनी दिली आहे.

या निवेदनावर विनायक सणगर, माजी उपसरपंच संजय सुतार, श्रीकांत पाटील, बाळू शेटे, मनोज सूर्यवंशी, ग्रा.पं. सदस्या संगीता पोवार, माजी उपसरपंच दिलीप राऊत, संजय लोखंडे, बाळू कुंभार, सलीम मालकापुरे, रिहाना मुल्ला, अल्का खाटकी यांच्या सह्या आहेत.