Breaking News

 

 

लाईव्ह मराठी स्पेशल : कोल्हापुरी ठसका : ‘अहो, जरा धीर धरा…’

शिजेपर्यंत माणसाला दम निघतो पण, निवेपर्यंत म्हणजेच गार होईपर्यंत दम निघत नाही,’ अशी एक जुनी म्हण आहे. लोकसभेच्या निवडणूक निकालाचंही असंच काहीसं झालं आहे. मतदान होऊन जवळपास महिना उलटला आहे. निकाल अद्याप लागायचा आहे. बरोबर दोन दिवसांनी म्हणजेच गुरुवारी निकाल जाहीर होणार आहे. मात्र, गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि राजकारण्यांपासून सर्वसामान्यांपर्यंत कोणालाच दम धरवत नाही. सर्वांचीच घालमेल सुरू आहे. काय होईल ? कोण येणार ? याचीच सर्वत्र चर्चा सुरू आहे.

टीव्ही चॅनलवाल्यांचा उत्साह तर ओसंडून वाहतो आहे. विविध वाहिन्यांनी तर मागील दोन दिवसात मतदानोत्तर चाचण्यांचा (एक्झिट पोल) भडिमार केला आहे. निवडणुकीच्या निकालाचा आणि हवामानाचा अंदाज भल्याभल्यांना येत नाही. तोंडघशी पडण्याची वेळ येते. माणसाच्या मनातलं कळायला ‘मनकवडा’ असावा लागतं. माणूस मनातलं खरं सांगेलच याची खात्री नसते. तोही बेरकी असतो. समोरच्याचे समाधान कसे होईल, हे ते ओळखतो. आणि त्याला हवं असलेले उत्तर देतो. मतदानानंतरच्या चाचण्या कशा घेतल्या जातात हे उघड आहे. समोरचा माणूस खरं बोलतोय, असे गृहीत धरून केवळ अंदाज बांधला जातो.

नार्को टेस्टसारख्या विज्ञानावर आधारित काही चाचण्यांच्या माध्यमातून माणसाच्या मनातील काढून घेता येते. पण, इथे मतदारांच्या संख्येपैकी दहा टक्के लोकांची ही अशी चाचणी घेता येणे अशक्य आहे. मुरलेला गुन्हेगार असो वा आणखी कोणी, त्याच्या मनात नेमकं काय चाललंय, हे कळणं महाकठीण आहे.

मतदानानंतरच्या चाचण्या जाहीर झाल्या असल्या तरी, गेल्या साडेचार वर्षात विविध कारणांनी ज्यांनी ज्यांनी भोगलं आहे त्यांच्या मनाचा थांगपत्ता कसा लागणार, त्यांनी कोणाच्या बाजूने आपला कौल दिला आहे, हे समजणे अवघड आहे. परिस्थितीने भरडलेला माणूस काय करेल हे सांगता येत नाही. प्रत्येक वेळा माणूस वाहवत जाईलच असं नाही. वारं काही असलं तरी, प्रत्येकाच्या अंतरंगातील काढून घेणे इतके सोपं नाही. अवघ्या दोन दिवसांचा प्रश्न आहे, जे काही घडणार आहे ते त्याच दिवशी स्पष्ट होईल. ‘दूध का दूध, पानी का पानी’ होणार आहे.

मतदानानंतरच्या चाचण्यांमुळे काहींना आनंद झाला आहे, तर काहीजण चिंतेत आहेत. मात्र घोडामैदान जवळ आले आहे. प्रत्येकाने काय केले, याचा आरसाच समोर येणार आहे. तोपर्यंत धीर धरण्याची गरज आहे, हे मात्र निश्चित.

ठसकेबाज

1,011 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग