टोप (प्रतिनिधी) : मौजे वडगांव (ता. हातकणंगले) येथे पत्नीच्या  चारित्र्यावर संशय घेत पत्नीचा पोटावर धारदार विळ्याने सपासप वार केला. तसेच गळा चिरुन तिचा खुन केला. तर खून करुन पती हातकणंगले पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाला. ही घटना आज (बुधवार) दुपारच्या सुमारास गावाबाहेरील शेतवडीतील सुतार पाणंद येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत महिलेचे नाव कविता चंद्रकांत कोरवी (वय ३२), आरोपी पती चंद्रकांत कोरवी (वय ४०), दोघेही (रा. मुळगाव निमशिरगाव, ता. शिरोळ, सध्या मौजे वडगांव) असे आहे. त्यांना दोन मुले असून यातील एक मुलगा मौजे वडगावात तर दुसरा मुलगा निमशिरगांव येथे असतो. चंद्रकांत हा आजोळ म्हणजे मौजे वडगांव येथे भोसले यांच्या घरी रहात होता. दोघेही गावात शेतमजूरी करून आपल्या कुटुंबाचा गाडा चालवत असताना दोघांच्यात वारंवार वाद होत. तर चंद्रकांत कविताच्या चारित्र्यावर संशय घेवून तिला मारहाणही करत असे. काल रात्री त्यांच्यात वाद झाला होता.

रात्री झालेला विसरुन कवीता सकाळच्या सुमारास प्रकाश चौगुले यांच्या शेतात ऊसाची लावण करण्यासाठी कामावर गेली होती. सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत कामाची वेळ असल्याने कविता दिड वाजेपर्यंत शेतात काम करत होती. तिला चंद्रकांत घरी बोलावण्यासाठी शेतात गेला होता. दोघेही घरी जाण्यासाठी सुतार पाणंदमधून निघाले होते. वाटेतच दोघांच्यात शाब्दिक वाद सुरू झाल्याने चंद्रकांतने कविताच्या गळ्यावर आणि पोटावर विळ्याने सपासप वार केले. गळ्यावर आणि पोटावर वर्मी घाव झाल्याने कविताचा जागीच मृत्यू झाला. यावेळी चंद्रकांतने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कविताच्या अंगावर ओढणी झाकून पोबारा करत हातकणंगले पोलिसात स्वतःहून हजर झाला.

या खुनाची माहिती मिळताच शिरोली पोलिस ठाण्याचे सपोनि. सागर पाटील, गुन्हे अन्वेषण विभागाचे संजय गोरले यानी घटनास्थळी धाव घेवून याबाबतची माहिती घेतली. मात्र, खुनात वापरलेला विळा मिळून आला नाही. यासाठी पोलीसांना खूप कसरत करावी लागली. या खुनाची नोंद शिरोली पोलिसात झाली आहे.