कोल्हापूर (प्रतिनिधी) :  महावितरणच्या कोल्हापूर भरारी पथकाने धाड टाकून माणगाववाडी इचलकरंजी येथे नुकतीच १५ लाख २१ हजार ७१० रुपयांची वीजचोरी पकडली आहे.

माणगाववाडी इचलकरंजी येथील ग्राहक लक्ष्मी नारायण यंत्रमाग औद्योगिक यांनी मीटरमध्ये फेरफार करून ९०२१६ युनिटची चोरी केल्याचे तपासात उघड झाले. यासाठी १५,२१,७१० रुपयांचे बिल देण्यात आले आहे. सोबतच विद्युत अधिनियमानुसार वीज चोरीसाठी तडजोडीची ९ लाख १० हजार रुपयेसुध्दा भरणे आवश्यक राहील. जर बिलाची व तडजोडीची रक्कम ठरावीक कालावधीत भरली नाही, तर विद्युत अधिनियम २००३ नुसार संबंधित पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येईल. सोबतच ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला जाईल.

या वीज चोरीची रक्कम भरण्यासाठी ग्राहकांना नियमानुसार मुदत देण्यात आली असून, विहित कालावधीत या ग्राहकांनी वीज बिलाची रक्कम भरली नाही, तर त्यांच्याविरूध्द  विद्युत अधिनियम २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.

विद्युत अधिनियम २००३ च्या कलम १३५ व १३६ नुसार वीज चोरी हा दंडनीय अपराध असून, यात आरोपींना सश्रम कारावसाच्या शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे ग्राहकांनी वीज चोरीपासून परावृत्त व्हावे, असे महावितरणने आवाहन केले आहे.

आगामी काळात वीजचोरांच्या विरोधात महावितरण अधिक आक्रमक होणार आहे. वीज वितरण हानी कमी करून महसुलात वाढ करणे तसेच महसूल वसुलीची क्षमता वाढवून महावितरणला आर्थिक सुद्दढता प्रदान करण्यासाठी  महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मोहिमा राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून वीजचोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे त्यांनी निर्देश दिले आहेत.