कोल्हापूर (प्रतिनिधी) : धनंजय महाडिक युवाशक्ती, भागीरथी महिला संस्था आणि पोलिस दलाच्या संयुक्त विद्यमाने महिला पोलिस अधिकारी- कर्मचारी आणि कुटुंबीयांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. अलंकार हॉलमध्ये आयोजित केलेल्या होम मिनिस्टर या कार्यक्रमात महिला पोलिस अधिकारी, कर्मचारी आणि कुटुंबीयांनी सहभागी होत या उपक्रमाचा निखळ आनंद लुटला.

पोलिस कर्मचारी नेहमीच कायदा आणि सुव्यवस्था राखण्याबरोबर मोर्चे, बंदोबस्त, आंदोलने आदी कामाचा प्रचंड ताण त्यांच्यावर असतो. या तणावातून बाहेर काढण्यासाठी आणि स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचे निखळ मनोरंजन करण्याच्या उद्देशाने भागीरथी महिला संस्था, धनंजय महाडिक युवाशक्ती आणि कोल्हापूर पोलिस दलाच्या संयुक्त विद्यमाने ‘होममिनिस्टर’ या मनोरंजनात्मक कार्यक्रम आणि स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.

याचे उद्घाटन महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक, अपर पोलीस अधीक्षक जयश्री देसाई, गृहपोलिस उपअधीक्षक प्रिया पाटील, अनुराधा सामंत यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. दरवर्षी अशा पध्दतीने विविध उपक्रम झाल्यास पोलिस कर्मचार्‍यांचे मनोबल वाढेल, असा विश्‍वास डॉ. कादंबरी बलकवडे यांनी व्यक्त केला. महिला पोलिसांच्या आरोग्यासाठी देखील विविध शिबिरे घेण्याचा मानस असल्याचे ‘भागीरथी’ संस्थेच्या अध्यक्षा अरूंधती महाडिक यांनी सांगितले.

होममिनिस्टरसह प्रश्‍न उत्तरे, नृत्य सादरीकरण, आकर्षक वेशभूषा यासह विविध खेळ घेण्यात आले. त्यातील विजेत्यांना अरूंधती महाडिक, खासदार धनंजय महाडिक, कृष्णराज महाडिक यांच्यासह अपर पोलिस अधीक्षक जयश्री देसाई, गृहपोलिस उपधीक्षक प्रिया पाटील यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

स्पर्धेत दीपाली पाटील यांना मानाची पैठणी, तर श्रध्दा आंबले यांना सोन्याची नथ, सोनम शियेकर यांना चांदीचा करंडा, अनिता पाटील, मेघा पाटील, सुजाता शिंदे यांना चांदीचे नाणे मान्यवरांच्या हस्ते भेट देण्यात आले. दत्ताजीराव माने सराफ पेढीच्या जयश्री माने आणि वनिता सांस्कृतिक मंडळाच्या अनुराधा सामंत यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.

जिजाऊ मसालेच्या वैशाली भोसले आणि भागीरथी महिला संस्थेचे या उपक्रमाला पाठबळ लाभले. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक मेघा पाटील, अंजना फाळके, श्रध्दा आंबले, कोमल पवार अनिता नारायणकर, अर्चना पाटील, शैलजा पाटील व भागीरथी संस्थेच्या सदस्या उपस्थित होत्या.