मुंबई (प्रतिनिधी) : अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या हस्तकांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट आखण्यात आला आहे, अशी माहिती देणारे ऑडिओ मेसेज एका अज्ञाताकडून मुंबई वाहतूक पोलिसांच्या मोबाईल क्रमांकावर आल्याची माहिती मिळाली. धक्कादायक मेसेजनंतर पोलिसांकडून याप्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली. 

मुंबईतील वाहतूक नियंत्रण कक्षात पुन्हा एकदा एक थक्क करणारा मेसेज आला आहे. यावेळी मात्र एकापाठोपाठ एक अशा अनेक ऑडिओ क्लिप वाहतूक नियंत्रण कक्षाच्या नंबरवर आल्या. यामध्ये एका अज्ञात व्यक्तीने दावा केला होता की, ‘अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचे हस्तक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हत्या करण्याचा कट आखत आहेत.हे हस्तक देशाला बर्बाद करण्याच्या प्रयत्नात असल्याचेही या अज्ञात व्यक्तीने म्हटले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २० नोव्हेंबर रोजी वाहतूक नियंत्रण क्रमांकावर ७ ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज आले. त्यापाठोपाठ २१ तारखेला पुन्हा १२ ऑडिओ क्लिप आणि काही मेसेज प्राप्त झाले.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, धक्कादायक मेसेज मिळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला. पोलिसांच्या तपासाची सूत्रे एका इसमाजवळ जाऊन थांबली. या व्यक्तिसंदर्भात चौकशी करण्यास पोलिसांनी सुरुवात केली. या प्रकरणाच्या तपासाअंती असे आढळून आले की, मेसेज करणाऱ्या व्यक्ती पूर्वी एका हिऱ्यांच्या कंपनीत दागिने डिझाईन करत होता; परंतु मानसिक आजारामुळे त्याला नोकरीवरून काढून टाकण्यात आलं. तो सध्या वर्षभरापासून बेरोजगार आहे.’ या व्यक्तीवर पोलिसांनी कोणती कारवाई केली की, नाही? यासंदर्भात अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.