कुरुंदवाड (प्रतिनिधी) : शिरोळ तालुक्यातील अब्दुललाट येथे ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू आहे. तर आज (सोमवार) अतिक्रमणाच्या प्रश्नावर ग्रामपंचायतीवर बेकायदेशीर मोर्चा काढला गेला. यावर आप्पा पाटील, प्रमुख आठ कार्यकर्त्यांसह एकूण शंभर जणांविरुद्ध कुरुंदवाड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. याची फिर्याद ग्रामविकास अधिकारी विजयसिंग कृष्णसिंग रजपूत यांनी दिली. या कारवाईने आंदोलकांत खळबळ उडाली आहे.

गावातील अतिक्रमण हटाव विरुद्ध अतिक्रमणधारकांना घेवून आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज दुपारी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आला होता. मात्र, ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता असतानाही बेकायदेशीरपणे मोर्चा काढला गेला. तसेच आचारसंहितेचा भंग केल्याचा आक्षेप घेत ग्रामविकास अधिकारी रजपूत यांनी पोलिसात आंदोलकाविरुद्ध तक्रार दिली.

पोलीसांनी आप्पासो बसगोंडा पाटील, दादासो तुकाराम मोहीते, सुमतीनाथ श्रीधर शेट्टी, रामचंद्र संतराम कुरणे, भास्कर यशवंत मोहीते, लक्ष्मी धोंडीराम जाधव, धीरज हानिफ जमादार, रुबीन फारुख मुजावर यांच्यासह अज्ञात शंभर जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.