Breaking News

 

 

दिल्लीत ‘कर्नाटक फॉर्म्युल्या’साठी विरोधकांच्या जोरबैठका !

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान १९ मे रोजी होत आहे. २३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आहेत. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला बहुमत मिळण्याची शक्यता कमी असल्याने केंद्रात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास आघाडी सरकार बनविण्यासाठी विरोधकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. केंद्रातही कर्नाटक फॉर्म्युला राबवण्याच्या शक्यतेवर विरोधक विचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची भेट घेतली आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये यावेळी कोणत्याच पक्षाला एकहाती बहुमत मिळणार नसल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला शह देऊन सत्तेत येण्यासाठी देशभरातील स्थानिक पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. १९८९ प्रमाणेच तिसऱ्या आघाडीचे सरकार यावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी सर्व विरोधी पक्षांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नात चंद्राबाबू नायडू अग्रेसर आहेत.

टीआरएसचे प्रमुख के. चंद्रशेखर राव आणि डाव्या आघाडीच्या सीताराम येचुरींची भेट घेतल्यानंतर शुक्रवारी नायडू दिल्लीत आले.  शुक्रवारी त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. निकालानंतर आघाडी करता येईल का याबद्दल गांधी यांच्याशी नायडू यांनी आज सकाळी चर्चा केली. गांधींंची भेट घेऊन नायडू लखनऊ येथे बसपा प्रमुख मायावती आणि सपा नेते अखिलेश यादव यांची देखील भेट घेणार आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आज काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधींना भेटून आगामी निकालांवर चर्चा करणार आहेत. २३ मेला लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर करण्यात येणार आहेत. तेव्हा भाजप दिल्लीचे तख्त राखतं की चंद्राबाबूंच्या आघाडीच्या प्रयत्नांना यश येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

२०१८मध्ये झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकल्या होत्या. परंतु, भाजपला बहुमत मिळू शकले नव्हते. या निवडणुकीत काँग्रेस दुसऱ्या तर जेडीएस तिसऱ्या क्रमांकावर होते. मात्र, ज्यादा सीट असूनही काँग्रेसने मुख्यमंत्रीपदावर दावा केला नव्हता. त्यांनी जेडीएसला पाठिंबा देऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवलं होतं. त्यामुळे केंद्रातही त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास ‘कर्नाटक फॉर्म्युला’ राबवला जाण्यासाठी विरोधकांकडून हालचाली सुरू असून त्यामुळेच दिल्लीत जोरबैठकांना जोर आला असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

795 total views, 3 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

News Flash

अर्थ - उद्योग