मुंबई (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दोन-चार पुस्तके अभ्यासासाठी द्या आणि पदावरून त्यांना त्वरित हटवावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे लक्ष्मण हाके यांनी केली.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कोणत्याही कार्यक्रमाला गेले की, त्यांची वादग्रस्त विधाने आणि त्यानंतर केली जाणारी सारवासारव हे आता महाराष्ट्राला आता नवे राहिले नाही. राज्यपाल कोश्यारी कोणतरी वादग्रस्त विधान करतात आणि त्या गोष्टीवरुन वादही उफाळून आले आहेत. काही दिवसांपूर्वी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल वक्तव्य केल्यानंतर त्यांनी आता थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलही वादग्रस्त वक्तव्य करुन नवा वाद निर्माण केला आहे.

भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून सतत वादग्रस्त वक्तव्य केली जात असल्याने काही संघटनांकडून त्यांना महाराष्ट्रातून हटवा अशीही मागणी त्यांनी केली आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शरद पवार यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर केल्याने भाजप विरुद्ध इतर पक्ष असा सामना रंगला आहे.

लक्ष्मण हाके यांनी भाजपवर आणि राज्यपाल या दोघांवर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, ज्या महाराष्ट्राचे तुम्ही राज्यपाल आहात, त्या महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराज यांना दैवतासमान मानते आणि अशा महान व्यक्तीविषयी तुम्ही वादग्रस्त विधान कसे काय करता असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. या प्रकरणी आता राज्यातील जनता भाजपला आणि राज्यपालांना माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.