मुंबई (प्रतिनिधी) : भारतीय सिने-सृष्टीत सध्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची म्हणजेच ‘इफ्फी’ची चर्चा आहे. उद्यापासून भारतातील या सर्वात मोठ्या चित्रपट महोत्सवाला सुरुवात होणार आहे. गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान हा महोत्सव पार पडणार आहे. 

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पाच मराठी चित्रपटांची निवड करण्यात आली आहे. यात विक्रम पटवर्धन यांचा ‘फ्रेम’, दिग्पाल लांजेरकचा ‘शेर शिवराज’, डॉ. सलील कुलकर्णी यांचा ‘एकदा काय झाले’, प्रवीण तरडे यांचा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ आणि शेखर रणखांबे यांच्या ‘रेखा’ या सिनेमांचा समावेश आहे.

मराठीसह हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांचे खास स्क्रिनिंग असणार आहे. चित्रपटप्रेमींना आठवडाभर मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. जवळपास आठ दिवस हा महोत्सव सुरू असणार आहे. यंदा कोणते कलाकार चित्रपट महोत्सवाला उपस्थित राहणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

५३ वा गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव’ खूप खास असणार आहे. या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बॉलिवूड अभिनेता अजय देवगणच्या बहुचर्चित ‘दृश्यम २’चे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले आहे. एसएस राजामौलींचा ‘आरआरआर’ आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘अभिमान’ हा चित्रपटदेखील प्रेक्षकांना महोत्सवाच्या पहिल्या दिवशी पाहता येणार आहे.