कोल्हापूर (प्रतिनिधी) : विद्यापीठ परीक्षांच्या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाचे बोधचिन्ह आणि लेटरहेडचा वापर करून फसवणूक केल्याबद्दल शुक्रवारी रात्री अज्ञाताविरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव (ताराबाई पार्क) यांनी फिर्याद दाखल केली आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांच्या कामकाजाविषयी चुकीच्या पद्धतीने मेेसेज देऊन विद्यापीठाची बदनामी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण करण्याच्या हेतूने अज्ञाताने विद्यापीठाचे बोधचिन्ह आणि लेटरहेडचा बनावट वापर करून चुकीचा मजकूर सोशल मीडियावर प्रसारित करण्याचा प्रकार केला आहे. हा प्रकार दि. २५ जुलैपासून आजपर्यंत सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे करत आहेत.