कोल्हापूर (प्रतिनिधी) : गुंतवणुकीच्या नावाखाली कामगारांचे रक्त शोषण्याला आमचा ठाम विरोधच आहे, असा प्रहार माजी ग्रामविकास व कामगारमंत्री, आमदार हसन मुश्रीफ यांनी केला. केंद्र सरकारच्या अन्यायी कामगार कायद्यांविरोधात रस्त्यावरील लढ्यातून संघर्षाची तयारी ठेवा, असेही आवाहन त्यांनी केले.

आयटकच्या कोल्हापुरातील तीन दिवसीय महाराष्ट्र अधिवेशनाच्या उद्घाटन सत्रात आमदार मुश्रीफ प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

मुश्रीफ पुढे म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत कामगार विरोधी धोरणे करायची आणि उद्योगपतींना लाल कार्पेट अंथरून गुंतवणुकीसाठी आणायचे नाटक करायचे, अशा प्रकारचे उद्योग या देशात सुरू आहेत. गुंतवणुकीसाठी उद्योजकांना आकर्षक सवलती देण्याबद्दल आमच्या हरकती असायची गरज नाही; मात्र कामगारांचे रक्त शोषून घेऊन अशा प्रकारच्या गुंतवणुकी येण्याला आमचा ठाम विरोधच आहे.

मुश्रीफ म्हणाले, कामगार वर्गाने जागृत होण्याची वेळ आली आहे. नव्या बदलत्या कामगार कायद्यामध्ये कायम वेतनावरील कामगार हा प्रकारच बंद झाला आहे. या विरोधात रस्त्यावर उतरून लढा पुकारला नाही कायम कामगार ही संज्ञाच नाहीशी होईल. फक्त दैनिक वेतन, फिक्स पगार आणि कंत्राटी कामगार एवढेच तीन प्रकार शिल्लक राहतील. अशा लोकांच्या पाठीशी ठामपणे खंबीर उभा राहण्याचे काम कायमपणे करू.

महाराष्ट्राच्या अकरा कोटी लोकसंख्येपैकी तब्बल पाच कोटी लोक कामगार या संज्ञेखाली येतात. त्यापैकी केवळ ८० लाख कामगार संघटित व संरक्षित आहेत. उर्वरित सव्वाचार कोटी कामगारांना कोणतेही संरक्षण नाही. यंत्रमाग कामगार, ड्रायव्हराचे कल्याणकारी मंडळ, घरेलू कामगार मंडळ, शेतमजूर कल्याणकारी मंडळ या सगळ्यांचा मसुदा तयार आहे. सत्ता नसली तरीही या कल्याणकारी मंडळाच्या स्थापनेसाठी पाठपुरावा करून असंघटित कामगारांच्या जीवनात आनंद फुलविणार आहोत, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रीय सचिव सुकुमार बांदे, सी. एम. देशमुख, कॉम्रेड खानोजी काळे, दिलीप पोवार, सुभाष लांडे, एस. बी. पाटील, मोहन शर्मा, सुभाष जाधव, कॉम्रेड अजित लवेकर आदी प्रमुख उपस्थित होते.