शेगाव (वृत्तसंस्था) : देशात आज भाजपने हिंसा, द्वेष आणि दहशत पसरवली आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केली. ते शुक्रवारी (१८ नोव्हेंबर) शेगावमधील भारत जोडो यात्रेच्या सभेत बोलत होते.

यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. विशेषतः या आधीच्या सभेत त्यांनी सावरकरांविरोधात वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांच्यावर टीकाही झाली. या सभेत मात्र त्यांनी सावरकरांवर बोलणे टाळले.

राहुल गांधी म्हणाले की, दहशत, द्वेष आणि हिंसेच्या विरोधात ही यात्रा सुरु केली. या यात्रेचे ध्येय कुणाला काही समजवायचे नाही. यात्रेचा उद्देश आपला आवाज, आपले दु:ख समजून घेण्याचा आहे. भीती, हिंसा, द्वेषाने तोडले जाते, तर प्रेमाने सर्व जोडले जाते. भारत जोडोचे ध्येय हे ‘मन की बात’ करण्यासाठी नाही, असा टोलाही राहुल गांधींनी लगावला.

राहुल गांधी म्हणाले, ही भूमी छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांची आहे. जगाला दिशा देणाऱ्या शिवरायांची ही भूमी आहे. इथे विदर्भातील शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. विम्याचे पैसे भरुन देखील शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. मोदी सरकारकडून शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नाही. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नाही. काही उद्योगपतींचं मात्र हजारो कोटींचे कर्ज माफ केले जाते, दोन-तीन उद्योगपती देशाचे कर्ज बुडवत आहेत, असा आरोपही राहुल गांधींनी केला.

मुले लाखो रुपये खर्च करुन शिक्षण घेतात. तरीही त्यांना रोजगार मिळत नाही, तरुणांना रोजगार नसलेला भारत आम्हाला नको आहे, असेही ते म्हणाले.

आपआपसांत भांडणे करुन कुणाचा फायदा झाला. महाराष्ट्रातील संतांनी कधी सांगितले का की, आपसांत भांडणे करा; नाही ना..मग आपण का भांडतो? भाजपने कुटुंबात भांडणे लावली; पण या भांडणांनी कुटुंबाचे नुकसान होत आहे. देशही एक कुटुंब आहे, या भांडणांनी देशाचा फायदा झाला का? भाजपने माणसे तोडण्याचे काम केले आम्ही ते जोडू.

राहुल गांधी म्हणाले, शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आणि महाराष्ट्राचा आवाज आहे. त्यांना घडवण्याचे काम राष्ट्रमाता जिजाऊंनी केले. आपण मला प्रेम आणि सहकार्य केले, आपण आम्हाला खूप काही शिकवले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी खूप काही शिकवले. मी जीवनभर विसरणार नाही की, महाराष्ट्रातील जनतेने मला शक्ती, ज्ञान आणि प्रेम दिले.​