Breaking News

 

 

मुरगूडचा सर पिराजीराव तलाव जनतेच्या मालकीचा करूया : आ. मुश्रीफ

मुरगूड (प्रतिनिधी) : आमच्या मालकीचा, आम्ही जमीन दिलेला, आम्ही श्रमदानाने  बांधलेला  ऐतिहासिक सर पिराजीराव तलाव  जनतेच्याच मालकीचा राहिला पाहिजे, अशी मुरगूडवासीयांची भावना आहे. त्यासाठीच लढा उभा होत आहे. तो यापुढे तीव्र करण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. त्यासाठी सनदशीर मार्गाने संघर्ष उभा केला जाईल अशी भूमिका आमदार हसन मुश्रीफ यांनी मांडली. ते आज (गुरुवार) मुरगूड पालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात मुरगूड, शिंदेवाडी व यमगे गावच्या पाणीप्रश्नाबाबत आयोजित बैठकीत बोलत होते.

आ. मुश्रीफ यांनी मुरगूडमध्ये सर्वप्रथम नगरपालिकेच्या प्रांगणातील छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला  पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. युवराज पाटील, भय्या माने, प्रवीण भोसले, मनोज फराकटे, नामदेव मेंडके यांची प्रमुख उपस्थिती होती.  त्यानंतर मुश्रीफ यांनी मुख्य बाजारपेठेतील स्व विश्वनाथआण्णा पाटील यांच्या पुतळ्याला त्यांनी पुष्पहार घातला. त्यानंतर नागरिकांसह शिवराज विद्यालयाच्या प्रांगणात कै. सदाशिवराव मंडलिक यांच्या स्मारकाला पुष्पहार घालून त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर सरपिराजीराव तलावातून थेट हुतात्मा चौकात राजर्षी शाहू महाराजांनी आणलेल्या चावीला त्यांनी पुष्पहार घातला.

आ. मुश्रीफ म्हणाले की, यावर्षी सर्वत्र दुष्काळाची तीव्रता अधिक असल्यामुळे जलसाठे घटले आहेत अशा परिस्थितीत पिण्यासाठी पुरेसा पाणीपुरवठा झाला पाहिजे. माझ्या मतदारसंघातील जनतेला पिण्याचे पाणी मुबलक प्रमाणात मिळाले पाहिजे याकरिता हे निवेदन नगरपालिका प्रशासनाला मी दिले आहे. या निवेदनाची दखल घेऊन पालिका प्रशासनाने हा तलाव मुरगूडकरांच्या मालकीचा झाला पाहिजे या दृष्टीने प्रयत्न करावेत. माजी नगराध्यक्ष प्रविणसिंह पाटील म्हणाले, तलावात सध्या पाणीपातळी २५ फूट असताना देखील शहराला अपुऱ्या दाबाने पाणीपुरवठा होत असेल तर तलाव मालकांनी पाईप लाईनचा हॉल्व्ह कमी केला असणार आहे. ही अरेरावी सहन केली जाणार नाही.

डी. डी. चौगले म्हणाले की, जमिनी, महसूल व श्रमदानाने वेठबिगारीने तलाव बांधला आहे. समरजितसिंह घाटगे मात्र  जलयुक्त शिवाराची टिमकी वाजवत फिरतात. मात्र मुरगूडच्या जनतेला पाण्यापासून वंचित ठेवता असा सवाल करीत १८ हजार पाणीपट्टी कोण घेते का ? आता तलाव अधिग्रहण करण्याची वेळ आली आहे. यावेळी यमग्याचे शिवाजीराव पाटील, शिंदेवाडीचे अॅड. जीवन शिंदे, दौलतवाडीचे विठ्ठल जाधव, विकास पाटील यांनीही या प्रश्नी तीव्र भावना व्यक्त केल्या.

बैठकीस पाणी पुरवठा समिती सभापती रविराज परीट, शामराव घाटगे, शामराव पाटील,बिद्रीचे संचालक प्रवीण भोसले, जि. प. सदस्य मनोज फराकटे, दीपक शिंदे, एस.व्ही.चौगले, शिवानंद माळी, अनिल राऊत, विशाल सुर्यवंशी,आनंदा मांगले, डॉ. सुनिल चौगले, आदी उपस्थीत होते. दिगंबर परीट यांनी आभार मानले.

शहरात २२ हातपंप बसवणार…
पालिकेत पाटील गटाची सत्ता असताना शहरातील विविध 22 ठिकाणी बोअरवेल मारले आहेत.  सर्व बोअरवेलला आचारसंहिता संपताच तातडीने हातपंप बसवत असल्याची ग्वाही आ. मुश्रीफ यांनी दिली.

660 total views, 6 views today

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

अर्थ - उद्योग

आरोग्य

 

क्रीडा