पेठवडगाव (प्रतिनिधी) : कोल्हापूर महापालिका परिवहन (केएमटी) विभागाच्या कोल्हापूर ते पेठवडगाव या मार्गावरील बस सेवेचे नियोजन कोलमडल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. केएमटीच्या वडगाव मार्गावरील बसेसचे नियोजन करण्याची मागणी प्रवाशांतून होत आहे.

कोल्हापूर ते वडगाव या वीस किलोमीटरच्या मार्गावर किमतीतर्फे दर अर्ध्या तासाला बस सेवा सुरू आहे. सकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत बसेस सुरू असतात. तसेच दैनिक चाळीस रुपये पास, मासिक पास, त्रे मासिक पास या सोयीमुळे प्रवासी वर्ग किमतीला जास्त प्राधान्य देत असल्यामुळे हा मार्ग फायद्यात आहे.

कळंबा ते एमआयडीसी मार्गे वडगाव तसेच बावडामार्गे नाना पाटील नगर अशा दोन मार्गावर दर अर्ध्या तासाने बसेस सोडल्या जातात. सायंकाळी पाचनंतर प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे बसेसना गर्दी होते. याच वेळी गाड्यांची संख्या कमी असते बऱ्याच वेळेला चालक किंवा वाहक रजेवर असल्यामुळे बस सेवा विस्कळीत होते आणि त्याचा प्रवाशांना ताटकळत बसच्या प्रतीक्षेत थांबावे लागते. विशेषत: महिला वर्गाला उभे राहून तासभर प्रवास करावा लागतो. त्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र बस सोडण्याची मागणी होत आहे.

सध्या कळंबा व नाना पाटील नगर येथून पेठवडगावला बसेस सोडल्या जातात. हा प्रवास सुमारे एक तासाचा असल्यामुळे बऱ्याच वेळेला चालक व वाहक ड्युटी करण्यास इच्छुक नसतात. त्यामुळे हा मार्ग बदलून शाहू खासबाग मैदान किंवा एसटी स्टँड ते पेठवडगाव असा केल्यास वाहक व चालकांना सोयीचे होईल.

या मार्गावर एमआयडीसी व शिये फाटापर्यंत प्रवाशांची संख्या जास्त असते. त्यामुळे कोल्हापूर ते एमआयडीसी शिरोली अशी वेगळी बस ठेवल्यास वडगाव मार्गावरील ताण कमी होऊ शकतो. त्या दृष्टीने केएमटी प्रशासनाने योग्य नियोजन करणे गरजेचे आहे; परंतु सध्या केएमटी प्रशासन नेमके काय करते? हा संशोधनाचा विषय आहे.

गेली दहा वर्षे आहे त्याच जुन्या मार्गावर जुन्या बसेसवर केएमटी सेवा सुरू आहे. चालक व वाहक यांच्या सेवेकडे पूर्णतः दुर्लक्ष झाले आहे. योग्य नियोजनाअभावी वडगाव मार्गावरील केएमटी सेवा म्हणजे’ ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशी अवस्था झाली आहे.