दिल्ली (वृत्तसंस्था) : दररोजच्या येणाऱ्या स्पॅम कॉलच्या त्रासापासून लवकरच मोबाईल वापरकर्त्यांची सुटका होणार आहे. स्पॅम कॉल रोखण्यासाठी केंद्र सरकारच्या दूरसंचार विभागाने निर्णय घेतला असून, यापुढे फोनवर अज्ञात नंबर नाही, तर फोन करणाऱ्याचे थेट नावच स्क्रीनवर दिसणार आहे.

यामुळे स्पॅम कॉल करणाऱ्यांना चाप बसणार आहे. सिम कार्ड विकत घेताना ज्या नावाने फॉर्म भरला ते नाव वापरकर्त्यांना आपल्या मोबाईलवर दिसणार आहे. कोणत्याही अॅप शिवाय मोबाईलवर नाव दिसण्याची सुविधा मोबाईल ग्राहकांना मिळणार आहे. या निर्णयामुळे थेट कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव समोर येणार आहे. दूरसंचारने स्पॅम कॉल्सच्या त्रासातून ग्राहकांची सुटका करण्यासाठी ही सुविधा उपलब्ध करुन देण्याचे निश्चित केले आहे. लवकरच सर्व मोबाईलवर हे फिचर सक्रिय केले जाणार आहे.

दूरसंचार नियामक लवकरच कॉलर्सची केवायसी आधारित यंत्रणा सक्रिय करणार आहे. याच्या अंमलबजावणीनंतर मोबाईलमध्ये एकही नंबर सेव्ह नसेल आणि त्या नवीन नंबरवरून कॉल आला, तर त्या नंबरसह कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव मोबाइल स्क्रीनवर दिसणार आहे.