मुंबई (प्रतिनधी) : महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार १ लाख तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देणार आहे. यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले आहेत. राजभवन येथे आज राज्यपाल भगतसिंग कोशयारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कौशल्य रोजगारमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. 

गेल्या काही महिन्यांंत राज्यातील काही महत्त्वाचे प्रकल्प राज्याबाहेर गेले. त्यामुळे महाराष्ट्रातल्या तरुणांचे रोजगार बुडाले. विरोधकांनी यावरुन सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार आरोप केले. या आरोपांना उत्तर देण्यासाठी आता शिंदे-फडणवीस सरकार सरसावले आहे. राज्य सरकारच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागाद्वारे राज्यात १ लाख २० हजार रोजगार निर्माण करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, याबाबत गेल्या काही दिवसांपासून कौशल्य अधिकारी काम करत आहेत. हाताला काम देणारे हात ही निर्माण व्हावेत राज्यातील गुंतवणूक वाढवण्यासाठी आम्ही हे करार करत आहोत गेल्या दोन तीन महिन्यात उद्योग राज्यबाहेर गेले असे आरोप केले जात आहेत; पण कुठलाही उद्योग एक दोन महिन्यांंत जात नाही, असा आरोप करत नजीकच्या काळात अनेक मोठे उद्योग राज्यात येतील, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.