कोल्हापूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीयांना ‘राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल’बाबतची माहिती व्हावी, यासाठी जास्तीत-जास्त पात्र तृतीयपंथीयांनी ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळविण्यासाठी संबंधित वेबसाईटला भेट देऊन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव तथा समाजकल्याण  विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणासाठी व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने राज्य स्तरावर व विभागीय स्तरावर राज्यातील तृतीयपंथीय हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करण्यास सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मान्यता दिली आहे. जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्या तसेच प्राप्त तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी जिल्हास्तरावर तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे.

तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियमानुसार जिल्हास्तरीय समितीद्वारे तृतीयपंथीयांना त्यांचे ओळख प्रमाणपत्र व ओळखपत्र आदा करण्याची तजविज आहे. त्यानुषंगाने सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभाग, मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत राष्ट्रीय तृतीयपंथीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पात्र तृतीयपंथीयांनी तृतीयपंथीय व्यक्तींसाठी राष्ट्रीय पोर्टलवर भेट देऊन अप्लाय ऑनलाईन यावर आपला युजरआयडी व पासवर्ड तयार करून आपली सर्व माहिती भरावी.

ऑनलाईन अर्जासोबत आवश्यक ती कागदपत्रे संलग्न करावीत. अधिक माहितीकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, समाजकल्याण कार्यालय, विचारे माळ, बाबर हॉस्प‍िटल शेजारी कोल्हापूर येथे ०२३१-२६५१३१८ वर संपर्क साधावा, असेही लोंढे यांनी कळविले आहे.